चिखली तालुक्यात उद्या ‘समाधान शिबिराचा’ जागर; एकाच छताखाली मिळणार विविध योजनांचा लाभशासकीय योजनांचा लाभ थेट जनतेच्या दारी; तहसीलदार विजय सवडे यांचे नागरिकांना आवाहन
चिखली ( एकनाथ माळेकर ):सर्वसामान्यांचे प्रलंबित प्रश्न स्थानिक पातळीवर सुटावेत आणि शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ एकाच ठिकाणी मिळावा, या उदात्त हेतूने चिखली तहसील कार्यालयाच्या वतीने विशेष ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराचे’ आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर शनिवार, १४ मार्च २०२६ रोजी तालुक्यातील दोन महत्त्वाच्या मंडळांमध्ये आयोजित करण्यात आले असून, नागरिकांनी याचा जास्तीत जास्त लाभ घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
येथे होणार शिबिराचे आयोजन:
प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, हे शिबिर खालील दोन ठिकाणी पार पडणार आहे:
१. चांधई मंडळ: मारोती मंदिराचे सभागृह, चांधई.
२. उदयनगर मंडळ: किसनदेव महाराज संस्थान, उदयनगर.
एकाच ठिकाणी मिळणार ‘या’ महत्त्वपूर्ण सेवा:
या शिबिरात महसूल, कृषी, आरोग्य आणि पुरवठा विभागाशी संबंधित शेकडो कामांचा निपटारा केला जाणार आहे. यात प्रामुख्याने:महसूल सेवा: प्रलंबित फेरफार मंजूर करणे (फेरफार अदालत), डिजिटल ७/१२ वाटप, उत्पन्न, जात, रहिवासी, नॉन-क्रिमिलेअर आणि शेतकरी दाखल्यांचे वितरण.शेतकरी योजना: PM किसान लँड सीडिंग, नैसर्गिक आपत्ती e-KYC, ‘Agristack’ अंतर्गत शेतकरी आयडी तयार करणे आणि महा-DBT पोर्टलवरील विविध योजनांचे लाभ.घरकुल योजना: पंतप्रधान आवास योजनेतील लाभार्थ्यांना घरकुलासाठी ५ ब्रास मोफत वाळू उपलब्ध करून देणे व अर्जांना मंजुरी देणे.पुरवठा व आधार: नवीन रेशन कार्ड, रेशन कार्ड दुरुस्ती, ई-केवायसी (e-KYC), नवीन आधार नोंदणी आणि आधार अपडेट करणे.आरोग्य सेवा: आभा कार्ड (ABHA Card) वितरण, आयुष्यमान भारत व महात्मा फुले जन आरोग्य योजनेचे लाभ, तसेच मोफत आरोग्य तपासणी व लसीकरण.इतर सेवा: संजय गांधी निराधार योजना, मतदान कार्ड वाटप, जॉब कार्ड वितरण आणि जन्म-मृत्यू/विवाह नोंदणी प्रमाणपत्रे.
महत्त्वाच्या सवलतींची मिळणार माहिती
शेतजमीन अकृषिक (NA) करण्यासाठी आता जिल्हाधिकाऱ्यांची स्वतंत्र सनद किंवा परवानगीची अट रद्द करण्यात आली असून केवळ एकदाच रूपांतरण शुल्क भरावे लागणार आहे. तसेच, १९६५ ते २०२४ या कालावधीतील तुकडेबंदी कायद्याचे उल्लंघन करून झालेले व्यवहार कोणत्याही अतिरिक्त शुल्काशिवाय ‘मानीव नियमित’ केले जाणार आहेत. यासोबतच ‘मुख्यमंत्री बळीराजा शेत/पाणंद रस्ते योजने’ची माहितीही यावेळी दिली जाणार आहे.
“शासकीय कार्यालयांचे उंबरठे झिजवण्याऐवजी, प्रशासन स्वतः जनतेच्या दारी येत आहे. चिखली तालुक्यातील नागरिकांनी, विशेषतः शेतकरी बांधवांनी आणि गरजू लाभार्थींनी या शिबिराचा लाभ घेऊन आपली प्रलंबित कामे करून घ्यावीत.”— श्री. विजय सवडे (तहसीलदार, चिखली)
