शब्द की राजकारण?” उपमुख्यमंत्री शिंदेंच्या निर्णयाकडे नजर; डॉ. रायमुलकरांच्या आमदारकीची उत्सुकता शिगेला…

Screenshot_2026-03-27-20-38-41-27_6012fa4d4ddec268fc5c7112cbb265e7

रघुनाथ आघाव लोणार तालुका प्रतिनिधी

लोणार:-राज्यातील विधान परिषदेच्या ९ जागांसाठी मे महिन्यात होणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. अनेक विद्यमान आमदारांचा सहा वर्षांचा कार्यकाळ संपत असल्याने नव्या चेहऱ्यांना संधी मिळण्याची शक्यता निर्माण झाली असून, इच्छुकांकडून जोरदार लॉबिंग सुरू झाले आहे. जिल्ह्यातील काही महत्त्वाचे नेतेही या स्पर्धेत उतरल्याने स्थानिक पातळीवर उत्सुकता वाढली आहे.या निवडणुकीत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे, एकनाथ शिंदे यांच्या सेनेचे, तसेच अजित पवार आणि शरद पवार यांच्या गटांसह काँग्रेस व भाजपचे आमदार निवृत्त होत आहेत. त्यामध्ये डॉ. नीलम गोऱ्हे, अमोल मिटकरी, शशिकांत शिंदे, राजेश राठोड, संदीप जोशी, दादाराव केचे, रणजीतसिंह मोहिते पाटील आणि संजय केनेकर यांचा समावेश आहे.विधानसभेतील सध्याचे संख्याबळ पाहता महायुतीला या निवडणुकीत स्पष्ट आघाडी आहे. ९ पैकी तब्बल ८ जागा महायुतीच्या वाट्याला जाऊ शकतात, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्यात भाजपला ५, शिंदे सेनेला २ आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला १ जागा मिळण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडीला केवळ एका जागेवर समाधान मानावे लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.दरम्यान, भाजपचे संदीप जोशी यांनी स्वतःहून पुन्हा संधी नको असल्याचे जाहीर केल्यामुळे पक्षात नवीन समीकरणे तयार होत आहेत. दादाराव केचे, रणजीतसिंह मोहिते पाटील आणि संजय केनेकर यांच्यापैकी कुणाला पुन्हा संधी मिळते, की पक्ष नव्या चेहऱ्यांना पुढे करतो, यावर इच्छुकांचे गणित अवलंबून आहे. विदर्भातील प्रतिनिधित्व टिकवण्यासाठी बुलढाण्याचे अनुभवी नेते विजयराज शिंदे यांचे नावही चर्चेत आहे.या सगळ्या घडामोडींमध्ये मेहकरचे माजी आमदार डॉ. संजय रायमुलकर हे केंद्रस्थानी आले आहेत. २०२४ च्या विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर एकनाथ शिंदे यांनी स्वतः रायमुलकरांना फोन करून “तुला विधान परिषदेवर घेतो” असा दिलेला शब्द आता चर्चेचा केंद्रबिंदू ठरला आहे. या पार्श्वभूमीवर शिंदे आपला शब्द पाळणार का, हा प्रश्न कार्यकर्त्यांमध्ये चर्चिला जात आहे.रायमुलकर यांच्या समर्थकांमध्ये मात्र आशावादाचे वातावरण आहे. जर शिंदेंनी दिलेला शब्द पाळला, तर रायमुलकर यांच्या रूपाने जिल्ह्याला पुन्हा विधान परिषदेत प्रतिनिधित्व मिळू शकते. त्यामुळे स्थानिक कार्यकर्त्यांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत.दुसरीकडे, सिंदखेडराजाचे माजी आमदार शशिकांत खेडेकर यांनीही आपली दावेदारी भक्कम करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. “भावी खासदार” अशा घोषणांसह त्यांच्या समर्थकांनी वातावरण निर्मिती केली आहे. खासदार प्रतापराव जाधव यांच्यासोबतचे राजकीय समीकरण लक्षात घेता, भविष्यातील मतभेद टाळण्यासाठी खेडेकर यांच्या नावाची शिफारस होण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे.एकूणच, विधान परिषद निवडणुकीच्या निमित्ताने जिल्ह्यातील राजकारणात चुरस वाढली असून, विजयराज शिंदे, डॉ. संजय रायमुलकर आणि शशिकांत खेडेकर यांच्यातील स्पर्धा अधिकच रंगत चालली आहे. आता अंतिम निर्णय पक्षश्रेष्ठींच्या हातात असून, “शब्द की राजकारण?” या प्रश्नाचे उत्तर लवकरच मिळणार आहे.

You may have missed

error: Content is protected !!