पोलीस भरतीच्या मैदानावर ‘खाकी’चं स्वप्न भंगलं; बुलढाण्याच्या २३ वर्षीय तरुणाचा पुण्यात दुर्दैवी अंत!
पुणे/बुलढाणा( बुलढाणा माझा न्युज )खाकी वर्दी परिधान करून आई-वडिलांचे स्वप्न साकार करण्याच्या प्रबळ जिद्दीने मैदानावर उतरलेल्या एका तरुण उमेदवाराच्या आयुष्याचा अत्यंत दुर्दैवी शेवट झाला आहे. पुणे येथील शिवाजीनगर पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर सुरू असलेल्या कारागृह शिपाई भरती प्रक्रियेत, धावण्याची कठीण चाचणी देताना बुलढाणा जिल्ह्यातील २३ वर्षीय तरुणाला आपले प्राण गमवावे लागले आहेत.
नेमकी घटना काय?
मूळचा चिंचोली (जि. बुलढाणा) येथील रहिवासी असलेला पुरुषोत्तम भीमराव बुरकुल (वय २३) हा शनिवारी सकाळी ९:२४ मिनिटांनी १६०० मीटर धावण्याच्या शारीरिक चाचणीसाठी मैदानात उतरला होता. अत्यंत उत्साहाने त्याने पहिल्या दोन फेऱ्या यशस्वीपणे पूर्ण केल्या. मात्र, तिसऱ्या फेरीदरम्यान सुमारे १४०० मीटर अंतर पार केल्यानंतर त्याच्या शरीराने अचानक साथ सोडली. आपले ध्येय गाठण्यासाठी केवळ २०० मीटर अंतर बाकी असतानाच पुरुषोत्तमला अपस्माराचा (फिट) झटका आला आणि तो वेगात जमिनीवर कोसळला.वैद्यकीय प्रयत्न ठरले अपयशीघटनेचे गांभीर्य ओळखून मैदानावर सज्ज असलेल्या वैद्यकीय पथकाने तातडीने धाव घेत त्याची प्राथमिक तपासणी केली. त्यावेळी त्याचे हृदयाचे ठोके अतिशय मंदावल्याचे निदर्शनास आले. त्याला तातडीने ससून रुग्णालयात हलवण्यात आले, परंतु दुर्दैवाने उपचारांपूर्वीच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.पुरुषोत्तमच्या मृत्यूची बातमी समजताच त्याच्या मूळ गावी, चिंचोली (बुलढाणा) येथे मोठी शोककळा पसरली आहे. एका कष्टकरी आणि होतकरू तरुणाचे ‘खाकी’ मिळवण्याचे स्वप्न कायमचे अधुरे राहिले असून, परिसरातून मोठी हळहळ व्यक्त होत आहे.
