बनावट नोटा देऊन फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; ४ जण अटकेतबुलढाणा स्थानिक गुन्हे शाखेची मलकापुरात धाडसी कारवाई; पोलिसांवर हल्ल्याचा प्रयत्न….
मलकापूर ( बुलढाणा माझा न्युज ): १ लाख रुपयांच्या मोबदल्यात १० लाख रुपयांच्या नोटा देण्याचे आमिष दाखवून सर्वसामान्यांची फसवणूक करणाऱ्या एका टोळीचा बुलढाणा स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) पर्दाफाश केला आहे. मलकापूर परिसरात सापळा रचून करण्यात आलेल्या या कारवाईत पोलिसांनी ४ आरोपींना अटक केली असून, त्यांच्याकडून ९ लाख रुपयांच्या ‘चिल्ड्रन बँक’च्या नोटा आणि इतर मुद्देमाल जप्त केला आहे.गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियाच्या माध्यमातून कमी पैशात जास्त पैसे देण्याचे आमिष दाखवून फसवणूक करण्याच्या घटना वाढल्या होत्या. याची गंभीर दखल घेत जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी स्थानिक गुन्हे शाखेला कारवाईचे आदेश दिले होते. दरम्यान, दि. ७ एप्रिल रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला गुप्त माहिती मिळाली की, काही तरुण मलकापूर परिसरात अशा प्रकारे लोकांना गंडा घालत आहेत.या माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक सुनील अंबुलकर यांच्या नेतृत्वात पथकाने मलकापूर शहरात सापळा रचला. पोलिसांची चाहूल लागताच आरोपींनी पथकावर हल्ला करून पळून जाण्याचा प्रयत्न केला, ज्यात पोलीस कर्मचारी किरकोळ जखमी झाले. मात्र, पोलिसांनी जिवाची पर्वा न करता अमोल रमेश गोरे (२५, रा. मलकापूर), भारत मधुकर वानखेडे (२५, रा. मलकापूर), अविनाश सुनील तायडे (२२, रा. मलकापूर) आणि चेतन गुलाबराव पाटील (२५, रा. महालखेडा, जि. जळगाव) या चौघांना ताब्यात घेतले.आरोपींच्या झडतीत ९ लाख रुपयांच्या ‘चिल्ड्रन बँक’ लिहिलेल्या बनावट नोटा, १५०० रुपये रोख, २ चाकू, ६ मोबाईल आणि २ ज्युपिटर मोपेड गाड्या असा एकूण २ लाख १ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपींविरुद्ध मलकापूर शहर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपी सध्या पोलीस कोठडीत आहेत.ही कारवाई पोलीस अधीक्षक निलेश तांबे, अपर पोलीस अधीक्षक श्रेणीक लोढा, अमोल गायकवाड, आनंद महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली पीआय सुनील अंबुलकर, पीएसआय अविनाश जायभाये व त्यांच्या पथकाने केली आहे.
