नांदुरा तहसीलदार हल्ला प्रकरण: मुख्य आरोपी २४ तासांत गजाआड; स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई५ लाख १ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त; २७ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी….
बुलढाणा ( बुलढाणा माझा वृत्तसेवा ):नांदुरा येथील तहसीलदार आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांवर शासकीय कार्यालयात घुसून जीवघेणा हल्ला करणाऱ्या मुख्य आरोपीला अटक करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला (LCB) यश आले आहे. समाधान भगवान मोरे (वय ५२) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून, अवघ्या २४ तासांच्या आत पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या आहेत. सविस्तर वृत्त असे की २३ एप्रिल २०२६ रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास तहसीलदार श्री. अजितराव जंगम हे त्यांच्या दालनात शासकीय काम करत होते. यावेळी आरोपी समाधान मोरे (रा. सम्राट अशोक नगर, बुलढाणा) आणि त्याच्या एका साथीदाराने तिथे प्रवेश केला. आरोपीचे वाळू वाहतूक करणारे टिप्पर (क्र. MH-28-AB-7638) महसूल विभागाने पकडले होते. याचा राग मनात धरून आरोपीने तहसीलदारांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली. त्यानंतर लोखंडी वस्तूने त्यांच्या डोक्यावर प्रहार करून त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली होती. याप्रकरणी नांदुरा पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी स्थानिक गुन्हे शाखेला तपासाचे आदेश दिले होते. पोनि सुनील अंबुलकर यांच्या नेतृत्वाखाली तीन पथके आरोपीच्या शोधात होती. २४ एप्रिल रोजी आरोपी साखळीखर्डा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील ‘सावंगी भगत’ येथे लपून बसल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा रचून त्याला ताब्यात घेतले.मुद्देमाल आणि पुढील कारवाई:आरोपीकडून ५ लाख रुपयांची विना क्रमांकाची क्रेटा कार, एक स्टीलचा चाकू आणि लोखंडी कोयता असा एकूण ५ लाख १ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपीला न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्याला २७ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.यांनी केली कारवाई:ही धाडसी कारवाई पोलीस अधीक्षक निलेश तांबे, अपर पोलीस अधीक्षक श्रेणीक लोढा (खामगाव), अमोल गायकवाड (बुलढाणा) यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि सुनील अंबुलकर, सपोनि यशोदा कणसे, पोउपनि अविनाश जायभाये, दिपक लेकुरवाळे, शरद गिरी, राजू टेकाळे, चांद शेख व अन्य कर्मचाऱ्यांच्या पथकाने केली आहे.
