उच्चशिक्षित अंगणवाडी सेविका प्रिया खरात यांना राज्यस्तरीय ‘शिवछत्रपती पुरस्कार’ प्रदानशैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याचा गौरव; तांदुळवाडीसह सिंदखेड राजा तालुक्याचे नाव उंचावले….
नाशिक/मालेगाव उच्चशिक्षित असूनही ग्रामीण भागातील बालकांच्या उज्ज्वल भविष्यासाठी अंगणवाडीत ज्ञानदानाचे पवित्र कार्य करणाऱ्या तांदुळवाडी (रुम्हणा) येथील अंगणवाडी सेविका प्रिया तेजकोर प्रकाश खरात यांना २०२६ चा राज्यस्तरीय ‘शिवछत्रपती पुरस्कार’ देऊन गौरवण्यात आले. मालेगाव (जि. नाशिक) येथे आयोजित एका दिमाखदार सोहळ्यात त्यांना या मानाच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथील आश्रयआशा फाउंडेशनच्या वतीने या राज्यस्तरीय पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. फाउंडेशनच्या संस्थापक सचिव श्रीमती आशाताई (अलका) बच्छाव यांनी प्रिया खरात यांच्या शैक्षणिक क्षेत्रातील अष्टपैलू कामगिरीची आणि अंगणवाडीतील मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी केलेल्या परिश्रमांची दखल घेऊन त्यांची या पुरस्कारासाठी निवड केली होती. २५ एप्रिल रोजी मा. प्रतापराव दिघावकर साहेब माजी विशेष पोलीस महानिरीक्षक व लोकसेवा आयोग सदस्य,डॉ. अमोल शेजवळ लासलगाव,प्रा. सी. डी. रोटे सर निफाड ,मा. संजय देशमुख संस्थापक अध्यक्ष, साईधनवर्षा फाऊंडेशन, नाशिक तसेच जगन्नाथ पंडित बच्छाव गुरूजी (नि.) कौळाणे यासह प्रमुख मान्यवरांच्या हस्ते त्यांना सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.प्रिया खरात यांचे शिक्षण M.Sc. (Maths), B.Ed., D.Ed. असे उच्च दर्जाचे झाले आहे. मोठ्या पगाराच्या नोकरीच्या संधी उपलब्ध असतानाही, त्यांनी तळागाळातील बालकांवर सुसंस्कार करण्यासाठी तांदुळवाडी येथील अंगणवाडीत काम करण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या या निर्णयाचे आणि जिद्दीचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.प्रिया खरात यांच्या मार्गदर्शनाखाली तांदुळवाडी केंद्राने जिल्ह्यात नावलौकिक मिळवला आहे.कुशल अंगणवाडी उपक्रम: जिल्हा परिषद बुलढाणा अंतर्गत राबवण्यात आलेल्या ‘कुशल अंगणवाडी’ कार्यक्रमात जिल्ह्यातील २६,००० बालकांची चाचणी घेण्यात आली होती.अक्षरा खरात हिचे यश: यातून निवडल्या गेलेल्या २६ गुणवंत विद्यार्थ्यांमध्ये प्रिया खरात यांच्या केंद्रातील ‘अक्षरा अनिता राजू खरात’ हिने स्थान पटकावले. विशेष म्हणजे, संपूर्ण सिंदखेड राजा तालुक्यातून निवड झालेली अक्षरा ही एकमेव विद्यार्थिनी ठरली.प्रिया खरात यांना मिळालेल्या या राज्यस्तरीय पुरस्कारामुळे त्यांच्यावर शैक्षणिक, सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील मान्यवरांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. त्यांच्या या यशामुळे ग्रामीण भागातील अंगणवाडी सेविकांच्या कार्याला एक नवी ओळख आणि प्रेरणा मिळाली आहे.
