पिक विमा तात्काळ द्या, अन्यथा 20 मे नंतर आंदोलन उग्र होणार — शेतकरी योद्धा कृती समितीचा इशारा….

0
IMG-20260430-WA0033

सिंदखेडराजा (अनिल दराडे) वाशीम येथे जिल्हाधिकारी कार्यालयात महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री ना. दत्तात्रय भरणे यांची शेतकरी प्रतिनिधींनी भेट घेत पिक विमा संदर्भात सविस्तर चर्चा केली.या बैठकीत शेतकरी योद्धा कृती समितीचे संस्थापक बालाजी सोसे यांच्यासह प्रविण गिते, किसनराव आटोळे, शिद्धेश्वर आंधळे,शिवानंद सांगळे, आकाश खरात आदी प्रतिनिधी उपस्थित होते.यावेळी प्रतिनिधींनी सिंदखेडराजा, देऊळगाव राजा व लोणार तालुक्यातील सन 2025 च्या खरीप हंगामातील पिक विमा व बागायती मदत तात्काळ मंजूर करून वितरित करण्यात यावी, अशी ठाम मागणी करत सविस्तर निवेदन सादर केले.मंत्री महोदयांनी शेतकऱ्यांची बाजू शांतपणे व सविस्तर ऐकून घेतली. कोणतेही ठोस आश्वासन देण्यात आले नसले तरी सादर केलेले निवेदन स्वीकारण्यात आले असून ते संबंधित कृषी विभाग, बुलढाणा येथे तात्काळ पाठविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.शेतकरी योद्धा कृती समितीच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याची दखल प्रशासन व कृषी विभागाने घेऊन संबंधित तिन्ही तालुक्यातील शेतकऱ्यांना न्याय मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.संघटनेच्या वतीने प्रशासनास 20 मे 2026 पर्यंतची अंतिम मुदत देण्यात येत आहे. या कालावधीत आमच्या हक्काचा पिक विमा व बागायती मदत तात्काळ मंजूर न झाल्यास 20 मे नंतर आंदोलन अधिक तीव्र व उग्र करण्यात येईल.संघटनेने स्पष्ट केले की प्रशासनाला सहकार्य म्हणून यापूर्वीचे आंदोलन स्थगित करून चर्चेचा मार्ग स्वीकारण्यात आला होता. मात्र आता चर्चा नाही, पुढील निर्णय अंतिम आणि निर्णायक असेल.सध्या पिक विमा कंपनी व कृषी विभागाच्या निर्णयाकडे संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यासह सिंदखेडराजा, देऊळगाव राजा व लोणार तालुक्यातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.शेतकरी योद्धा कृती समितीने स्पष्ट केले आहे की आम्ही आमच्या हक्कासाठी लढा सुरू ठेवला असून न्याय मिळेपर्यंत तो थांबणार नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!