समृद्धी महामार्गावर खासगी बसचा थरार! चालत्या बसला भीषण आग; ३५ प्रवाशांचा जीव थोडक्यात वाचला….
लोणार (बुलढाणा माझा न्युज ):समृद्धी महामार्गावर पुन्हा एकदा आगीचे तांडव पाहायला मिळाले. पुण्याहून पुसदकडे जाणाऱ्या एका खासगी ट्रॅव्हल्सला लोणार तालुक्यातील शिवणी पिसा शिवारात अचानक भीषण आग लागली. या आगीत बस पूर्णपणे जळून खाक झाली आहे; मात्र चालकाचे प्रसंगावधान आणि मागून येणाऱ्या वाहनचालकाच्या सतर्कतेमुळे बसमधील सर्व ३५ प्रवासी सुखरूप बाहेर पडले.मिळालेल्या माहितीनुसार, पुण्याहून पुसदकडे जाणारी खासगी प्रवासी बस (क्र. MH 38 F 3899) शनिवारी सायंकाळी ५:४५ च्या सुमारास समृद्धी महामार्गावरील चॅनेल क्रमांक २९६ जवळून जात होती. यावेळी बसच्या मागील भागातून धूर निघत असल्याचे मागून येणाऱ्या एका वाहनचालकाच्या लक्षात आले. त्याने तत्काळ बस चालकाला इशारा देऊन ही बाब सांगितली.धूर निघत असल्याचे समजताच चालक आकाश जमदाडे याने बस तातडीने रस्त्याच्या कडेला थांबवली. बसमध्ये ३५ प्रवासी गाढ झोपेत किंवा प्रवासाच्या धुंदीत होते. कर्मचाऱ्यांनी आरडाओरड करून प्रवाशांना तातडीने खाली उतरवले. सर्व प्रवासी खाली उतरल्यानंतर काही क्षणांतच आगीने भीषण रूप धारण केले आणि संपूर्ण बस आगीच्या गोळ्यात रुपांतरित झाली.घटनेची माहिती मिळताच मेहकर पोलीस, महामार्ग पोलीस आणि समृद्धी महामार्ग प्रशासनाचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाने शर्थीचे प्रयत्न करून आग आटोक्यात आणली, मात्र तोपर्यंत बसचा केवळ सांगाडा उरला होता. या घटनेमुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती.अपघातानंतर प्रवाशांच्या संतापाला आणि रोषाला सामोरे जावे लागेल, या भीतीने बस चालक आकाश जमदाडे (रा. पुसद) घटनास्थळावरून पसार झाला. याप्रकरणी मेहकर पोलीस अधिक तपास करत असून आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही.
