बुलढाणा पोलिसांची चित्तथरारक कारवाई; समृद्धी महामार्गावरील दरोडेखोरांची आंतरराज्य टोळी जेरबंद८ आरोपींना बीडमधून अटक; १२.४८ लाखांचा मुद्देमाल जप्त…

0
Screenshot_2026-05-04-15-27-07-25_3a637037d35f95c5dbcdcc75e697ce91

बुलढाणा ( बुलढाणा माझा न्युज ): समृद्धी महामार्गावर शस्त्राचा धाक दाखवून वाहने आणि रोकड लुटणाऱ्या एका मोठ्या आंतरराज्य टोळीला जेरबंद करण्यात बुलढाणा पोलिसांना यश आले आहे. स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) बीड जिल्ह्यात अत्यंत धाडसाने ही कारवाई करत ८ सराईत गुन्हेगारांना बेड्या ठोकल्या. त्यांच्याकडून पिस्तुल, काडतुसे, वाहने आणि रोख रक्कम असा एकूण १२ लाख ४८ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.या घटनेबाबत मिळालेली माहिती अशी की, दि. ३ मे २०२६ रोजी फिर्यादी अभयसिंह वाघेला (३२, रा. गुजरात) यांनी किनगाव राजा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली होती. २ मे रोजी रात्री १०:४५ च्या सुमारास वाघेला हे आपल्या मालकाचे १२ लाख रुपये घेऊन स्कॉर्पिओने (MH-01-EJ-3768) नागपूरहून गुजरातकडे जात होते. समृद्धी महामार्गावरील दुसरबीड टोलनाक्याजवळ टायरमधील हवा तपासण्यासाठी ते थांबले असता, मागून आलेल्या बोलेरो व इनोव्हामधील १० ते १२ जणांनी त्यांना घेरले. दरोडेखोरांनी वाघेला यांना मारहाण करत पिस्तुलचा धाक दाखवला आणि त्यांची ८ लाखांची गाडी व १२ लाखांची रोख रक्कम घेऊन त्यांना जंगलात सोडून दिले.गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी तात्काळ तपासाचे आदेश दिले. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुनील अंबुलकर यांनी तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त बातमीदारांमार्फत माहिती मिळवली की, ही टोळी बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई येथील एका साखर कारखाना परिसरात लपून बसली आहे. पोलिसांनी कोणताही विलंब न लावता अंबाजोगाई येथे पोहोचून सापळा रचला आणि स्वतःच्या जीवाची पर्वा न करता या टोळीतील ८ सदस्यांना शिताफीने पकडले.अटक करण्यात आलेले आरोपी हे महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, कर्नाटक, गुजरात आणि जम्मू-काश्मीर अशा विविध राज्यांमधील आहेत. यामध्ये हिम्मतसिंग जुनी (बीड), मुन्ना वर्मा (उत्तर प्रदेश), मनोज कुटे (बीड), मो. रशिद गुज्जर (जम्मू-काश्मीर), सचिन शिर्के (रायगड), हरीश देवळीकर (कर्नाटक), अरुणकुमार यादव (उत्तर प्रदेश) आणि जसपालसिंग झाला (गुजरात) यांचा समावेश आहे.पोलिसांनी आरोपींकडून १ लाख ८० हजार रुपये रोख, एक देशी बनावटीचे पिस्तुल, ४ जिवंत काडतुसे, एक इनोव्हा गाडी, एक बोलेरो गाडी (क्र. MH-24-BL-1411), ४ मोबाईल आणि २ वायफाय डिव्हाईस असा एकूण १२ लाख ४८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.ही कारवाई पोलीस अधीक्षक निलेश तांबे, अप्पर पोलीस अधीक्षक श्रेणिक लोढा (खामगाव) आणि अमोल गायकवाड (बुलढाणा) यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि. सुनील अंबुलकर, प्रताप बाजड व त्यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पूर्ण केली. या कारवाईत बीड स्थानिक गुन्हे शाखेचेही मोलाचे सहकार्य लाभले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!