बुलढाणा ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई: मध्य प्रदेशातून चोरीचा माल जप्त, आरोपीला बेड्या….
बुलढाणा (बुलढाणा माझा न्युज ) बुलढाणा ग्रामीण पोलिसांनी चोरीच्या गुन्ह्याचा तपास लावत एका आरोपीला मध्य प्रदेशातून शिताफीने अटक केली आहे. आरोपीकडून चोरीला गेलेला मुद्देमाल जप्त करण्यात पोलिसांना यश आले असून, या कारवाईमुळे आंतरराज्यीय स्तरावर गुन्हे करणाऱ्या टोळ्यांचे धाबे दणाणले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी तक्रारदार यांनी दिलेल्या तक्रारीवरून बुलढाणा ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. यामध्ये मोठ्या प्रमाणावर विजेच्या वायरची चोरी झाली होती. या प्रकरणाचा गांभीर्याने तपास करण्यासाठी पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली एक विशेष पथक तयार करण्यात आले.
तांत्रिक विश्लेषण आणि खबऱ्यांच्या माहितीवरून, चोरीचा माल मध्य प्रदेशातील बडवानी जिल्ह्यातील ‘वरला’ परिसरात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पथकाने तात्काळ मध्य प्रदेशात रवाना होऊन सापळा रचला. पोलिसांनी आरोपी रविंद्र उर्फ गोलू मगन सोलंकी याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून चोरीला गेलेला एकूण १,८०,००० रुपये किमतीचा १० क्विंटल वजनाचा विजेच्या तारेचा (कॉपर वायर) माल जप्त करण्यात आला आहे.
ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक, अप्पर पोलीस अधीक्षक आणि उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली बुलढाणा ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक, सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि त्यांच्या पथकातील अंमलदारांनी यशस्वीरीत्या पार पाडली.
आरोपीला न्यायालयात हजर केले असता, त्याला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या प्रकरणात अजून काही धागेदोरे हाती लागण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.
