खंडाळा मकरध्वज येथे घरासमोर कापलेले लिंबू फेकून अघोरी कृत्याचा प्रयत्न!CCTV फुटेजमुळे संशयितांचे बिंग फुटले; चिखली पोलिसांत जादूटोणा विरोधी कायद्यान्वये गुन्हा दाखल…
चिखली ( बुलढाणा माझा वृत्तसेवा)
शनिश्चरी अमावस्येच्या पार्श्वभूमीवर पूर्ववैमनस्यातून किंवा अघोरी जादूटोण्याच्या हेतूने एका अभियंत्याच्या घरासमोर कापलेले आणि अख्खे लिंबू फेकून भीतीचे वातावरण निर्माण केल्याचा धक्कादायक प्रकार खंडाळा मकरध्वज येथे उघडकीस आला आहे. या विकृत प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली असून, चिखली पोलिसांनी दोन संशयितांविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) आणि जादूटोणा विरोधी कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, खंडाळा मकरध्वज येथील रहिवासी व पेशाने अभियंता असलेले प्रविण संजय साळवे (वय २९) हे आज, १७ मे रोजी सकाळी नेहमीप्रमाणे फिरण्यासाठी बाहेर गेले होते. सकाळी सुमारे ६:२० वाजता त्यांच्या पत्नी साक्षी साळवे यांना घराच्या मुख्य दरवाजाजवळ एक पूर्ण व एक कापलेले लिंबू पडलेले आढळून आले. त्यांनी तातडीने ही माहिती पती प्रविण साळवे यांना फोनवरून दिली. साळवे यांनी घरी येऊन पाहणी केली असता, हा प्रकार अंधश्रद्धा किंवा अघोरी कृत्याच्या हेतूने करण्यात आल्याचा संशय त्यांना आला
घटनेचे गांभीर्य ओळखून प्रविण साळवे यांनी घराबाहेरील सीसीटीव्ही (CCTV) फुटेज तपासले. यामध्ये गावातीलच एक संशयित इसम चोरट्या पावलांनी साळवे यांच्या घरासमोर येतो आणि काही क्षणांतच लिंबू फेकून तेथून पसार होतो, हे दृश्य कॅमेऱ्यात स्पष्ट कैद झाले आहे.
घटनेनंतर साळवे यांनी गावातील तंटामुक्ती अध्यक्ष नानाभाऊ ठेंग यांना बोलावून संबंधित सीसीटीव्ही फुटेज दाखवले. फुटेजमधील व्यक्ती ही गावातीलच शेख गणी शेख दादु व त्याचा मुलगा शेख अजमत शेख गणी असल्याचे त्यांनी ओळखले. शनिश्चरी अमावस्येचा मुहूर्त साधून जुन्या वादातून हा जादूटोण्याचा अघोरी प्रकार करण्यात आल्याची चर्चा आता गावात सुरू आहे.
या अघोरी प्रकारामुळे साळवे कुटुंबाला प्रचंड मानसिक त्रासाला सामोरे जावे लागले. अखेर प्रविण साळवे यांनी त्यांचे मामा दादाराव श्रीराम पडघान यांच्यासह चिखली पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. चिखली पोलिसांनी घटनेची गंभीर दखल घेत स्टेशन डायरी क्रमांक २२/२६ अन्वये नोंद केली असून, दोन्ही आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता आणि जादूटोणा विरोधी कायद्यांतर्गत संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत आजच्या आधुनिक आणि वैज्ञानिक युगातही अशा अघोरी आणि जादूटोण्याच्या प्रकारांमुळे खंडाळा मकरध्वज परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. अंधश्रद्धा पसरवून दहशत निर्माण करणाऱ्या अशा विकृत प्रवृत्तींवर पोलिसांनी कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.
