शेंदुरजन येथे अवैध रेती वाहतुकीवर पोलिसांची कारवाई ; दोन टिप्परसह 40.60 लाखांचा मुद्देमाल जप्त
सिंदखेडराजा (अनिल दराडे ) साखरखेर्डा : मेहकर उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाच्या पथकाने सिंदखेडराजा तालुक्यातील शेंदुरजन शिवारात अवैध रेती वाहतुकीवर धडक कारवाई करत दोन टिप्पर व ६ ब्रास रेतीसह अंदाजे ४० लाख ६० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी चार जणांविरुद्ध साखरखेर्डा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पोहेकॉ/५१२ डिंगांबर मंगलसिंग चव्हाण यांना २८ मे रोजी गुप्त माहिती मिळाली होती की, काही टिप्पर चालक मलकापूर पांगरा ते शेंदुरजन मार्गावरून विनापरवाना गौण खनिज रेतीची वाहतूक करून जादा दराने विक्री करत आहेत. त्यानुसार उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक तयार करण्यात आले.पोलिसांनी शेंदुरजन शिवारातील बळीराजा फॅमिली रेस्टॉरंट समोर नाकाबंदी केली असता दुपारी सुमारे ३ वाजताच्या दरम्यान दोन टिप्पर अडविण्यात आले. तपासणीदरम्यान संबंधित वाहनांमध्ये विनापरवाना रेती वाहतूक होत असल्याचे आढळून आले.या कारवाईत सिग्मा कंपनीचा टिप्पर (क्र. NL-01-AD-4434) व अशोक लेलँड टिप्पर (क्र. MH-28-BB-4099) तसेच एकूण ६ ब्रास रेती जप्त करण्यात आली. जप्त मुद्देमालाची अंदाजे किंमत ४० लाख ६० हजार रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.या प्रकरणी मल्हारी सुदाम भुसारी (रा. बारलिंगा), भगवान तुकाराम धारे (रा. निमगाव गुरु), उमेश रामराव गायकवाड (रा. हिवरखेड पूर्णा यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२), ३(५) तसेच गौण खनिज अधिनियम १९५७ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सदर कारवाईत पोलीस कर्मचारी सुनिल देशमुख, उमेश घुगे, किशोर सांगळे, सुनिल गाडे, कैलास गाडे, बद्री शिंदे, पंढरीनाथ जाधव, विलास जायभाये आदींनी सहभाग घेतला. पुढील तपास सहाय्यक फौजदार रामदास वैराळ करीत आहेत.
