प्रत्येक पात्र कुटुंबापर्यंत आयुष्मान भारत योजनेचा लाभ पोहोचवणार” — गटविकास अधिकारी अजितकुमार बांगर!सिंदखेडराजा तालुक्यात आयुष्मान भारत कार्ड वाटप मोहिमेला वेग; नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
सिंदखेडराजा (अनिल दराडे) पंचायत समिती सिंदखेडराजा अंतर्गत आरोग्य विभागाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना कार्ड वाटप मोहिमेला तालुक्यात मोठा प्रतिसाद मिळत आहे.सावरगाव माळ, महारखेड, भोसा, किनगाव राजा आदी ग्रामपंचायतींमध्ये विशेष शिबिरांचे आयोजन करून पात्र लाभार्थ्यांना आयुष्मान भारत कार्डचे वितरण करण्यात आले.”तालुक्यातील प्रत्येक पात्र कुटुंबाला आयुष्मान भारत योजनेचा लाभ मिळावा, यासाठी प्रशासन कटिबद्ध असून ग्रामीण भागात व्यापक जनजागृती मोहीम राबविण्यात येत आहे,” असे प्रतिपादन गटविकास अधिकारी अजितकुमार बांगर यांनी यावेळी केले.या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना दरवर्षी पाच लाख रुपयांपर्यंत मोफत आरोग्य विमा संरक्षण उपलब्ध होत आहे. सरकारी तसेच मान्यताप्राप्त खासगी रुग्णालयांमध्ये कॅशलेस उपचाराची सुविधा मिळत असल्याने ग्रामीण भागातील सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळत आहे.यावेळी विस्तार अधिकारी पवार, घुगे यांच्यासह संबंधित ग्रामपंचायतींचे सरपंच, उपसरपंच, सदस्य तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित अधिकाऱ्यांनी नागरिकांना आयुष्मान भारत कार्डचे महत्त्व समजावून सांगत तात्काळ नोंदणी करण्याचे आवाहन केले.आरोग्य विभागाच्या वतीने अजूनही ज्यांनी आयुष्मान भारत कार्ड काढले नाही, त्यांनी आपल्या ग्रामपंचायत कार्यालयाशी संपर्क साधून योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे. शासनाची ही लोककल्याणकारी योजना ग्रामीण भागातील आरोग्य सुरक्षेसाठी महत्त्वपूर्ण ठरत असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली. आयुष्मान भारत कार्ड वाटप प्रसंगी लाभार्थ्यांना मार्गदर्शन करताना गटविकास अधिकारी अजितकुमार बांगर व उपस्थित मान्यवर.
