​”वरवंडला दारूच्या विळख्यातून मुक्त करा! ग्रामपंचायतीच्या आदेशाची पायमल्ली करत पुन्हा हातभट्टीसह देशी-विदेशी दारूची अवैध विक्री सुरूच!”

0
1-4-77

बुलढाणा ( बुलढाणा माझा न्युज ):बुलढाणा तालुक्यातील वरवंड येथे अवैध दारू विक्रीने डोके वर काढले असून, ग्रामपंचायतीने दारू विक्रेत्यांना बजावलेल्या नोटिसांनाही न जुमानता विक्री सुरूच असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. गावात हातभट्टीसह देशी-विदेशी दारूची सर्रास विक्री होत असल्याने कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे.मिळालेल्या माहितीनुसार, वरवंड ग्रामपंचायतीने गावातील शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी आणि तरुणाईला व्यसनापासून वाचवण्यासाठी अवैध दारू विक्रेत्यांना नोटीस बजावली होती. यात तातडीने गावच्या हद्दीत दारू विक्री बंद करण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र, स्थानिक दारू विक्रेत्यांनी या पत्राला केराची टोपली दाखवत आपला अवैध व्यवसाय अविरत सुरू ठेवला आहे.गावात होत असलेल्या बेकायदेशीर दारू विक्रीमुळे रोजची भांडण-तंट्याची संख्या वाढली आहे. यामुळे गावातील वातावरण गढूळ झाले असून, महिलांना घराबाहेर पडणेही मुश्कील झाले आहे. अनेक घरांचे संसार या दारूमुळे उघड्यावर आले असूनही प्रशासन आणि पोलीस याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप संतप्त ग्रामस्थांनी केला आहे.ग्रामपंचायतीने पत्रव्यवहार करूनही विक्रेते जुमानत नसल्याने आता या प्रकरणी पोलीस प्रशासन आणि जिल्हा उत्पादन शुल्क विभागाने कठोर पावले उचलण्याची गरज निर्माण झाली आहे. जर प्रशासनाने वेळीच दखल घेतली नाही, तर गावकऱ्यांना तीव्र आंदोलनाचा पवित्रा घ्यावा लागेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!