वझर आघाव–भुमराळा शिवेवरील धोकादायक डीपी; शेतकरी दुहेरी संकटात!

0
IMG-20260622-WA0030

लोणार(रघुनाथ आघाव) वझर आघाव–भुमराळा शिवेवरील शेतशिवारात उभारलेला महावितरणचा वीज ट्रान्सफॉर्मर (डीपी) सध्या अत्यंत धोकादायक अवस्थेत असून तो कोणत्याही क्षणी कोसळण्याच्या स्थितीत आला आहे. वाकलेल्या खांबांवर तोल सांभाळत उभा असलेला हा डीपी आणि त्याला जोडलेल्या विद्युत तारा पाहता परिसरातील शेतकरी व ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे हा मार्ग शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा असल्याने संभाव्य दुर्घटनेचा धोका दिवसेंदिवस वाढत आहे.स्थानिक शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, गेल्या अनेक महिन्यांपासून डीपीची अवस्था दिवसेंदिवस अधिकच खालावत चालली आहे. खांब मोठ्या प्रमाणात झुकले असून ट्रान्सफॉर्मर एका बाजूला कललेला दिसत आहे. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर जोरदार वारे आणि मुसळधार पावसामुळे हा डीपी कोसळण्याची शक्यता अधिक वाढली आहे.महत्त्वाचे म्हणजे, याच रस्त्याने परिसरातील शेतकरी आपल्या जनावरांना पाणी पाजण्यासाठी खडक पूर्णा नदीवर घेऊन जातात. दररोज मोठ्या संख्येने जनावरे व शेतकरी या मार्गाने ये-जा करतात. तसेच वझर आघाव येथील अनेक शेतकऱ्यांची शेती भुमराळा व सावरगाव तेली शिवारात असल्याने त्यांनाही आपल्या शेतात जाण्यासाठी याच रस्त्याचा वापर करावा लागतो. त्यामुळे हा डीपी कोसळल्यास असंख्य शेतकरी, शेतमजूर आणि जनावरांच्या जीविताला गंभीर धोका निर्माण होऊ शकतो.शेतकऱ्यांनी सांगितले की, या धोकादायक परिस्थितीबाबत महावितरणच्या संबंधित अधिकाऱ्यांना अनेकदा तोंडी माहिती देण्यात आली आहे. त्यानंतर ठेकेदाराची काही माणसे एक दिवस घटनास्थळी आली. त्यांनी केवळ एक-दोन पोलचे चालढकल पद्धतीने काम केले आणि त्यानंतर पुन्हा कोणीही परत फिरकले नाही. परिणामी समस्या जशीच्या तशी कायम राहिली असून शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.विशेष बाब म्हणजे, यावर्षी ‘एल निनो’च्या प्रभावामुळे पावसामध्ये अनियमितता राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना पिकांसाठी सिंचनावर अधिक अवलंबून राहावे लागू शकते. मात्र हा ट्रान्सफॉर्मर कोसळल्यास या डीपीवर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांसमोर आणखी मोठे संकट उभे राहणार आहे. वीजपुरवठा खंडित झाल्यास पिकांना पाणी देण्यासाठी पर्यायी लाईनची व्यवस्था कुठून करायची, असा प्रश्न निर्माण होणार असून शेतकरी चारही बाजूंनी अडचणीत सापडण्याची शक्यता आहे.”एखाद्या निष्पाप शेतकऱ्याचा किंवा जनावराचा जीव गेल्यानंतरच महावितरण जागे होणार का?” असा संतप्त सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे. सध्या खरीप हंगाम सुरू असल्याने शेतात मोठ्या प्रमाणात वर्दळ असून कोणत्याही क्षणी मोठी दुर्घटना घडू शकते, अशी भीती व्यक्त केली जात आहे.ग्रामस्थांनी महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन नवीन खांब उभारावेत व ट्रान्सफॉर्मर सुरक्षित करावा, अशी मागणी केली आहे. अन्यथा भविष्यात घडणाऱ्या कोणत्याही दुर्घटनेसाठी महावितरण प्रशासन व संबंधित ठेकेदार यांनाच जबाबदार धरले जाईल, असा इशारा शेतकरी व ग्रामस्थांनी दिला आहे.फोटो कॅप्शन :वझर–भुमराळा शिवेवरील धोकादायकरीत्या झुकलेला महावितरणचा डीपी;

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!