उमरद येथे मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत; पुलाच्या अभावामुळे ग्रामस्थ त्रस्त
सिंदखेडराजा ( अनिल दराडे)
उमरद परिसरात आज झालेल्या मुसळधार पावसामुळे भटीचा ओढा तुडुंब भरून वाहू लागला आहे. उमरद ते आडगाव राजा या मार्गावर ओढ्यावर पूल नसल्याने ग्रामस्थांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे.
पाण्याची पातळी डोक्याएवढी झाल्याने महिला व पुरुष ग्रामस्थांना जीव धोक्यात घालून ओढा ओलांडावा लागत असून ग्रामस्थांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण आहे. अनेकांना आवश्यक कामासाठी पाण्यातूनच वाट काढावी लागत आहे.
दरम्यान, नदीकाठी वसलेले गजानन आंधळे यांचे घर थेट पुराच्या पाण्याच्या टप्प्यात आल्याने त्यांना गंभीर धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे त्यांनीही तातडीने पूल बांधकामाची मागणी केली आहे.
गावकऱ्यांनी माननीय आमदार साहेबांकडे त्वरीत पावले उचलून या ठिकाणी पूल उभारणी करण्यात यावी, अशी आग्रही मागणी केली असून प्रशासनाने याकडे तातडीने लक्ष द्यावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
