कै. तुकाराम कायंदे विद्यालय रुम्हणा च्या शिरपेचात मानाचा तुरा ५७ किलो वजनी गटातील कुस्ती स्पर्धेत बुध्दीवंत जाधवचा झंझावाती विजय
सिंदखेडराजा (अनिल दराडे)सिंदखेडराजा तालुक्यातील क्रीडा संकुलन येथे झालेल्या तालुका स्तरावरील क्रीडा स्पर्धांना हजारो क्रीडाप्रेमींनी दाद दिली. विविध खेळांमध्ये विद्यार्थ्यांनी आपले कसब सादर केले. मात्र, कुस्तीच्या आखाड्यात कै. तुकाराम कायंदे विद्यालय, रुम्हणा चा विद्यार्थी बुध्दीवंत गौतम जाधव याने झंझावाती विजय मिळवत प्रथम क्रमांक पटकावून आपला ठसा उमटविला.५७ किलो वजनी गटातील कुस्तीत बुध्दीवंतचा चुरशीचा खेळ पाहून प्रेक्षकांनी टाळ्यांचा कडकडाट केला.
अतिशय गरीब परिस्थितीत असूनही बुध्दीवंतने हार न मानता मेहनतीच्या जोरावर आपली वेगळी ओळख निर्माण केली.
त्याच्या मेहनतीला, चिकाटीला आणि खेळातील प्रामाणिकपणाला आज सुवर्ण फळ मिळाले.
या शानदार कामगिरीमुळे रुम्हणा विद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला असून गावकऱ्यांत व तालुक्यातील क्रीडाप्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.
बुध्दीवंतच्या विजयाबद्दल सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. “हा मुलगा पुढे राज्य व राष्ट्रीय स्तरावर देखील कुस्तीच्या मैदानात आपले नाव कोरून दाखवेल” असा ठाम विश्वास शिक्षकवर्ग व क्रीडाप्रेमींनी व्यक्त केला आहे.
