ऐतिहासिक आडगाव राजा – सावखेड तेजन रस्त्यावर जीवघेणे खड्डे बुजवा अन्यथा2 सप्टेंबर पासून आमरण उपोषणरामदास कहाळे यांचे जिल्हाधिकारी यांना निवेदन
सिंदखेड राजा (अनिल दराडे )जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या निष्क्रियतेमुळे ऐतिहासिक आडगाव राजा ते सावखेड तेजन या महत्त्वाच्या रस्त्यावर “अपघातांचा सापळा” बनला असून यामुळे शाळकरी विद्यार्थी, प्रवासी, व प्राथमिक आरोग्य केंद्रात येणाऱ्या रुग्ण यांना सातत्याने त्रास होत असून सदर खड्डे तात्काळ बुजविण्यात येवून डांबरीकरण निकृष्ट करणाऱ्या कंत्राटदार यांना काळया यादीत टाकण्यात येऊन शाखा अभियंता व गुणवत्ता नियंत्रक यांच्या वर कारवाई करा अन्यथा 2 सप्टेंबर पासून आमरण उपोषणाचा इशारा आझाद समाज पार्टी कांशीराम या पक्षाचे सिंदखेड राजा तालुका अध्यक्ष रामदास कहाळे यांनी तहसीलदार सिंदखेड राजा यांच्या मार्फत जिल्हाधिकारी यांना एका निवेदनाद्वारे दिला आहे.
राष्ट्रमाता जिजाऊंच्या जन्म स्थळाजवळील अवघ्या १३ किमी अंतरावर असलेल्या राजे लखोजीराव जाधव यांच्या ऐतिहासिक आडगाव राजा नगरीकडे जाणारा हा मार्ग दररोज शेकडो लोकांच्या प्रवासाचा आधार असून, आता मोठ्या खड्ड्यांमुळे नागरिकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे.
बस वाहतूक, रुग्णांची ने-आण, शेकडो विद्यार्थ्यांचा प्रवास धोक्यात
आडगाव राजा येथे प्राथमिक आरोग्य केंद्र असल्याने रुग्णांना तातडीने सिंदखेड राजा येथे हलवावे लागते. त्याचप्रमाणे शेकडो विद्यार्थी दररोज हाच मार्ग वापरून शिक्षणासाठी जातात. शासकीय बससेवा तसेच खाजगी बस वाहतूक देखील याच घाटावरून सुरू असते. या प्रचंड खड्ड्यांमुळे कोणत्याही क्षणी भीषण अपघात होण्याची शक्यता आहे.
पर्यटकांसाठी धोकादायक रस्ता!
आडगाव राजा हे विदर्भातील एकमेव भुईकोट किल्ल्यासाठी तसेच प्राचीन हेमाडपंथी रेणुका देवी मंदिरासाठी प्रसिद्ध आहे. या ठिकाणी दरवर्षी हजारो पर्यटक दाखल होतात. मात्र अशा पर्यटकांना आज खड्ड्यांनी भरलेला मार्ग आणि प्रशासनाचे नाकर्तेपण यांचा सामना करावा लागत आहे.
निकृष्ट दर्जाच्या कामाचे बिंग फुटले!
सावखेड तेजन नदीपासून घाटापर्यंत उन्हाळ्यात करण्यात आलेले डांबरीकरण पावसाळ्याच्या पहिल्याच सरींमध्ये उखडून निघाले आहे. काम निकृष्ट दर्जाचे झाल्याने आज रस्ता खड्ड्यांनी विद्रूप झाला आहे. यासाठी जबाबदार असलेले शाखा अभियंता व गुणवत्ता नियंत्रक यांच्यावर तातडीने कारवाई करून त्यांच्या कडूनच या निकृष्ट कामाचा खर्च वसूल करण्याची मागणी रामदास कहाळे यांनी केली आहे
एकंदरीत, ऐतिहासिक वारसा लाभलेली आडगाव राजा नगरी आज खड्ड्यांच्या विळख्यात सापडली असून नागरिक, रुग्ण, विद्यार्थी आणि पर्यटक यांच्या जिवाशी खेळले जात आहे. प्रशासनाने वेळीच लक्ष न दिल्यास या घाटातील खड्डे कोणत्याही क्षणी भीषण दुर्घटनेला आमंत्रण देतील आणि त्याची जबाबदारी थेट शासनावर राहील!
जर प्रशासनाने या खड्ड्यांत तातडीने दगड, मुरूम टाकून रस्त्याची डागडुजी केली नाही, तर 2 सप्टेंबर पासून आमरण उपोषनास बसणार असून एखादी दुर्घटना घडल्यास बांधकाम विभागच पूर्णपणे जबाबदार राहील
रामदास कहाळे
तालुकाध्यक्ष
आझाद समाज पार्टी कांशीराम
सिंदखेड राजा
