तुपकरांच्या नेतृत्वात मलकापुरात शेतकऱ्यांचा भव्य मोर्चा ; पिकविमा, कर्जमुक्तीच्या प्रश्नावर रविकांत तुपकर आक्रमक..’क्रांतिकारी’ आंदोलनाचा वणवा पेटवणार..
मलकापूर (एकनाथ माळेकर)ऑगस्ट २०२५: शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी आणि विविध मागण्यांसाठी क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वाखाली आज, शनिवारी मलकापूर येथे उपविभागीय अधिकारी कार्यालयावर शेतकऱ्यांचा भव्य मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात मोठ्या संख्येने शेतकरी बांधव सहभागी झाले होते. थकलेला पिक विमा 100% मिळावा, शेतकऱ्यांना कर्जमुक्ती मिळावी, विवरा गावातील सोलर कंपनीने अतिक्रमण केलेला रस्ता मोकळा व्हावा, ज्वारीची खरेदी सुरू व्हावी, तसेच कापूस आणि सोयाबीनच्या आयात-निर्यात धोरणात बदल व्हावा,शेतमजूरांना विमा सुरक्षा मिळावी, जंगली जनावरांचा त्रास अशा विविध मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला.
सोयाबीन कापूस उत्पादकांसाठी लढाई उभी करणार

मोर्चाला संबोधित करताना शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी सरकार आणि प्रशासनावर जोरदार टीका केली. ते म्हणाले, “शेतकऱ्यांची ही लढाई दुसऱ्या स्वातंत्र्याची लढाई आहे. सरकारने कापसावरील आयात शुल्क हटवल्याने कापसाचे भाव कमी होण्याची भीती आहे. त्यामुळे सरकारने तातडीने आयात-निर्यात धोरणात बदल करावा. तसेच, सोयाबीनची सोयापेंड निर्यात करावी, जेणेकरून शेतकऱ्यांना सोयाबीनला रास्त भाव मिळन्यास मदत होईल.”
तुपकर यांनी पुढे सांगितले की, आज मलकापूरात सुरू झालेला हा मोर्चा एका वणव्यासारखा संपूर्ण महाराष्ट्रात पसरेल. “निवडणुकीपूर्वी सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफीचे दिलेले आश्वासन पूर्ण करावे. पिक विमा कंपन्यांनी अधिक विलंब न करता शेतकऱ्यांना थकित पिक विमा त्वरित द्यावा. सध्या आम्ही शांततेच्या मार्गाने आंदोलन करत आहोत, परंतु सरकारने दिरंगाई केली तर आम्हाला आक्रमक आंदोलनही करता येईल,” असा इशारा त्यांनी दिला.
शेतकऱ्यांच्या मागण्या थकित पिक विमा त्वरित मिळावा: पिक विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांना थकित रक्कम तातडीने द्यावी.
शेतकरी कर्जमुक्ती: सरकारने निवडणुकीपूर्वी दिलेले कर्जमाफीचे आश्वासन पूर्ण करावे.
सोलर कंपनीचे अतिक्रमण हटवावे: विवरा गावातील सोलर कंपनीने अतिक्रमण केलेला रस्ता मोकळा करावा.
ज्वारी खरेदी सुरू व्हावी: शेतकऱ्यांची ज्वारी ची खरेदी त्वरित सुरू करावी
आयात-निर्यात धोरणात बदल: कापसावरील आयात शुल्क पुन्हा लागू करावे आणि सोयाबीन डीओसी, सोयापेंड निर्यातीला परवानगी द्यावी.
मोर्चात मोठ्या संख्येने शेतकऱ्यांचा सहभाग

या मोर्चात मलकापूर तालुक्यासह आसपासच्या परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. शेतकऱ्यांनी जनता चौक ते तहसील कार्यालय पायी मोर्चा करत आपला रोष व्यक्त केला. शांततेत काढण्यात आलेल्या या मोर्चाने प्रशासनाला शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी केली आहे.
मोठा पोलीस बंदोबस्त अन प्रशासनाला इशारा

रविकांत तुपकर यांनी प्रशासनाला उद्देशून सांगितले की, “शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी प्रशासनाने त्वरित पावले उचलावीत. आम्ही शांततेच्या मार्गाने लढत आहोत, पण गरज पडल्यास आम्ही आंदोलन तीव्र करू.”
मोर्चाच्या आयोजनाची जबाबदारी
अमोल राऊत आणि सचिन शिंगोटे यांनी पारपाडली यावेळी सचिन पांडुळे,दामोदर शर्मा,गजानन भोपळे,विश्वास पाटील प्रविण पाटील,रंजीत डोसे, हर्षल मोरे, गोपाल रायपुरे, भागवत अढाव, विलास इंगळे,सुरज कोलते, गजानन नाईकवाडे,यांची प्रामुख्याने उपस्थिती होती
हा मोर्चा शेतकऱ्यांच्या एकजुटीचे आणि त्यांच्या हक्कांसाठीच्या लढ्याचे प्रतीक ठरला असून, येत्या काळात या आंदोलनाचा वणवा राज्यभर पसरण्याची शक्यता तुपकर यांनी व्यक्त केली आहे.
