महसूल सेवकांना चतुर्थ श्रेणी दर्जा न दिल्यास बेमुदत धरणे आंदोलन
सिंदखेडराजा (अनिल दराडे) विदर्भ महसूल सेवक संघटना (रजि. क्र. महाराष्ट्र 199/90 नागपूर) तालुका शाखा सिंदखेडराजा तर्फे महसूल सेवक (कोतवाल) पदास शासकीय चतुर्थ श्रेणी दर्जा मिळावा या प्रमुख मागणीसाठी आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.
संघटनेने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, महसूल विभाग हा राज्य शासनाचा कणा असून गावपातळीवर शासनाच्या सर्व योजना राबविण्यात महसूल सेवकांची भूमिका महत्त्वाची आहे. महसूल कामकाजाबरोबरच बिगर महसुली कामे – जातप्रमाणपत्रे, आपत्ती व्यवस्थापन, जनगणना, निवडणुका आदी जबाबदाऱ्या महसूल सेवकांवर सोपविल्या जातात. तरीदेखील शासनाने आजवर कोतवालांना वर्गीकृत शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा दिलेला नाही. यामुळे कोतवालांना अन्याय सहन करावा लागत असून, तात्काळ चतुर्थ श्रेणीचा दर्जा देण्यात यावा अशी मागणी संघटनेने केली आहे.
प्रमुख मागण्या :
महसूल सेवकांना तात्काळ चतुर्थ श्रेणी दर्जा लागू करावा.
मागणी मान्य होईपर्यंत दरमहा किमान ₹30,000 मानधन द्यावे.
११/१२/२०२४ रोजीचा राजपत्र तात्काळ रद्द करावा.
महसूल विभागातील वर्ग डि.बी. पदांत ४०% ऐवजी ८०% पदे महसूल सेवकांसाठी राखीव ठेवावीत.
तलाठी व ग्रामविकास अधिकारी भरतीत महसूल सेवकांना ५०% आरक्षण द्यावे.
सेवा निवृत्त महसूल सेवकांना ₹15,000 पेन्शन लागू करावी.
डाक ने-आण करणाऱ्या महसूल सेवकांना T.A. बिल वेळेत द्यावे.
ग्राम महसूल कार्यालयांतील खाजगी ऑपरेटर बंद करावेत.
आंदोलनाची रूपरेषा :
१० सप्टेंबर २०२५ रोजी काळ्या फिती लावून कामकाज.
११ सप्टेंबर २०२५ रोजी तालुका पातळीवर लक्षवेधी धरणे आंदोलन.
१२ सप्टेंबर २०२५ पासून महसूल मंत्री यांच्या क्षेत्रात (कीडा संकुल, कोराडी येथे) बेमुदत धरणे आंदोलन व साखळी उपोषण.
महसूल सेवकांच्या मागण्यांकडे शासनाने तातडीने सकारात्मक निर्णय न घेतल्यास राज्यभरातील महसूल विभागाचे कामकाज ठप्प होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
