खेळाडूंनी यशासाठी सातत्य ठेवावे – ठाणेदार संजय मातोंडकर

IMG-20250913-WA0046

सिंदखेडराजा (अनिल दराडे)सिंदखेडराजा तालुक्यातील दुसरबीड येथील नारायणराव नागरे महाविद्यालयात संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ, अमरावती यांच्या वतीने आयोजित आंतरमहाविद्यालयीन विद्यापीठ स्तरीय कबड्डी स्पर्धा (मुली) दिनांक १० सप्टेंबर ते १३ सप्टेंबर २०२५ दरम्यान मोठ्या उत्साहात पार पडल्या. या स्पर्धेत विद्यापीठ अंतर्गत पाच जिल्ह्यातून तब्बल १७ संघांनी सहभाग नोंदवून आपली खेळाडू वृत्ती सिद्ध केली.

समारोप कार्यक्रमास अध्यक्षस्थानावर प्राचार्य डॉ. विजय नागरे होते. आपल्या मार्गदर्शनपर भाषणात ते म्हणाले, “कोणत्याही स्पर्धेत हार–जीत ही अपरिहार्य असते. पण जीवनात खऱ्या अर्थाने यश मिळवायचे असेल, तर मागच्याशी तुलना व पुढच्याशी स्पर्धा या तत्त्वांचा स्वीकार करणे आवश्यक आहे. जिंकणे किंवा हरवणे यापेक्षा सातत्य, परिश्रम आणि ध्येय निष्ठा महत्त्वाची आहे. खेळाडूंनी यश मिळवण्यासाठी प्रयत्नांची अखंड परंपरा ठेवली पाहिजे.”
या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून किनगाव राजा पोलीस स्टेशनचे ठाणेदार मा. संजयजी मातोंडकर (सहाय्यक पोलीस निरीक्षक) उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांना शिस्त, खेळाडूवृत्ती व एकजुटीचे महत्त्व पटवून दिले. दुसरे प्रमुख पाहुणे संस्थेचे सचिव शिवराजभाऊ कायंदे यांनी ग्रामीण भागातील मुलींनी दाखविलेल्या सहभागाचे विशेष कौतुक केले. ते म्हणाले, “जिद्द, चिकाटी आणि कठोर परिश्रमाच्या जोरावर ग्रामीण भागातील विद्यार्थ्याही राज्य व राष्ट्रीय स्तरावर नावलौकिक मिळवू शकतात. यश हे मागे धावायचे नसते, तर योग्य परिश्रम केले की ते आपोआप आपल्या मागे येते.”
तसेच दुसरबीड नगरीचे तंटामुक्ती अध्यक्ष शेख याकूब यांनीही उपस्थिती दर्शवून खेळाडूंना शुभेच्छा दिल्या.
या स्पर्धेत अंतिम फेरीत ब गटातून शंकरलाल खंडेलवाल महाविद्यालय, अकोला आणि धाबेकर महाविद्यालय, कारंजा लाड यांच्यात चुरशीचा सामना झाला. दोन्ही संघांनी अप्रतिम कौशल्य दाखवत प्रेक्षकांची मने जिंकली. अखेर धाबेकर महाविद्यालय, कारंजा लाड विजेता ठरले, तर शंकरलाल खंडेलवाल महाविद्यालय, अकोला उपविजेता ठरले. विजेत्या व उपविजेत्या संघांना पारितोषिक वितरण करून गौरविण्यात आले.
महाविद्यालयाने सलग तिसऱ्यांदा या स्पर्धेचे यशस्वी यजमानपद भूषवून एक वेगळी परंपरा निर्माण केली आहे. या यशाचे श्रेय महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजय नागरे यांचे मार्गदर्शन तसेच संयोजक प्रा. एस.आर. वाघ, प्रा. डॉ. गणेश घुगे, प्रा. डॉ. दीपक देशमाने, प्रा. देवानंद नागरे, प्रा. नयना गवारे, प्रा. सत्यम श्रीवास्तव, प्रा. सुधाकर तारे, प्रा. राम पोखरकर, प्रा. मिलिंद गवई, श्री. अनिल रणमळे, श्री. अझर, श्री. गजानन मुंढे यांसह सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्या अथक परिश्रमांना जाते.
स्पर्धेचे पंच म्हणून प्रा. शेख युनूस, प्रा. गजानन राठोड, प्रा. डॉ. डाबरे, प्रा. पी.पी. नागरे, प्रा. डॉ. कडू, प्रा. डॉ. शुभांगी दामले व डॉ. संगीता खडसे यांनी कार्यभार सांभाळला.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल विद्यापीठ कुलगुरू मा. डॉ. मिलिंद बारहाते यांनी महाविद्यालयाचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

You may have missed

error: Content is protected !!