चिखली येथे मोटरसायकल व एसटी बसचा भीषण अपघात, अपघातात एकाचा मृत्यू…….
चिखली( निलेश कोल्हे) चिखली येथे मेहकर फाटा शनिवारी १३ सप्टेंबर रोजी झालेल्या अपघातात एका वृद्धाचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या भरधावं बसने धडक दिल्याने दुचाकीस्वार वृद्ध जागीच दगावला आहे.
सायळा येथील गणेश दत्तुगीर गिरी (वय ६०) हे आपल्या मोटारसायकल (क्र. एमएच २८ बीयू ०५९३) ने वरून चिखलीकडे येत होते . दरम्यान एस.टी. महामंडळाच्या भरधाव बस (क्र. एमएच ४० एन ९१३३) ने दुचाकीला जोरदार धडक दिली. अपघात एवढा भीषण होता की गणेश गिरी यांचा जागीच मृत्यू झाला आहे.
गणेश गिरी हे चिखली येथील तलाठी विनोद गिरी यांचे वडील होत. त्यामुळे प्रशासकीय वर्तुळात व स्थानिक नागरिकांमध्ये अपघातामुळे खळबळ उडाली. शोककळा पसरली असून हळहळ व्यक्त होत आहे. अपघाताची माहिती मिळताच चिखली पोलीस ठाण्याचे अधिकारी कर्मचारी मेहकर फाटा येथे दाखल झाले. अपघातमुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. चिखली पोलिसांनी वाहतूक सुरळीत केली. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे.
