सातारा हिल हाफ मॅरेथॉनमध्ये चिखलीचा विजयाचा झेंडा फडकला

IMG-20250920-WA0005

चिखली ( निलेश कोल्हे)
देशातील सर्वात खडतर मानल्या जाणाऱ्या मॅरेथॉन पैकी एक म्हणून ओळखली जाणारी सातारा हिल हाफ मॅरेथॉन स्पर्धा यंदा उत्साहात पार पडली. या स्पर्धेत देशभरातून नामांकित खेळाडूंनी सहभाग नोंदवला. महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतून आलेल्या स्पर्धकांमध्ये चिखली तालुक्याच्या धावपटूंनी देखील आपला ठसा उमटवला.

चिखली येथील एकूण ११ धावपटूंनी या प्रतिष्ठेच्या मॅरेथॉन मध्ये सहभाग घेऊन आपल्या तालुक्याचे नाव उंचावले. विशेष म्हणजे या सर्व धावपटूंनी कठीण उंचसखल रस्ते, हवामानातील चढ-उतार आणि तीव्र शारीरिक कसोटी यांचा सामना करत उत्कृष्ट कामगिरी केली.

विष्णू सोळंकी, नंदकिशोर पिसे पाटील व अनिल काळे मामा या तिघा खेळाडूंनी अप्रतिम खेळ कौशल्याचे दर्शन घडवत सिल्वर मेडल पटकावले. त्यांचा वेग, जिद्द आणि सातत्य पाहून आयोजक व प्रेक्षकांनी कौतुकाचा वर्षाव केला.

तसेच, चिखली तालुक्याचे तहसिलदार संतोष काकडे साहेब यांच्यासह राजेश झाडगे, राजेश बाहेकर, भागवत सरनाईक, कैलास ठेंग, संतोष रिंढे व नाना सपकाळ यांनी देखील उत्कृष्ठ धाव घेत ब्राँझ मेडल मिळवले. या सर्व खेळाडूंनी मिळवलेल्या यशामुळे चिखली तालुक्याचा अभिमान वाढला आहे.

स्पर्धेनंतर उपस्थित मान्यवरांनी विजेत्यांचे अभिनंदन करत त्यांच्या जिद्दीचे कौतुक केले. स्थानिक क्रीडा संघटनांनीही या सर्व धावपटूंचा सत्कार करण्याची घोषणा केली आहे. या विजयामुळे चिखलीच्या धावपटूंना नवचैतन्य मिळाले असून आगामी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांसाठी प्रेरणा मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

सातारा हिल हाफ मॅरेथॉन स्पर्धेतील चिखलीच्या धावपटूंचा हा यशस्वी सहभाग संपूर्ण परिसरासाठी प्रेरणादायी ठरला असून, या खेळाडूंनी दाखवलेला संघर्ष आणि मेहनत तालुक्यातील तरुणांना खेळात पुढे जाण्यासाठी बळ देणारा ठरेल, असेही मत व्यक्त होत आहे.

You may have missed

error: Content is protected !!