सिंदखेडराजा मध्ये शिव पाणंद रस्ते सीमांकणाचे काम जोरात सुरु, रस्ते सीमांकणामध्ये भूमी अभिलेख विभागाची असणार महत्वाची भूमिका
सिंदखेडराजा( अनिल दराडे)
प्रत्येक शेतकऱ्यासाठी आणि गावातील प्रत्येकासाठी शेत रस्ता हा खूप जिव्हाळ्याचा विषय असतो. कधी कधी या रस्त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये वाद सुद्धा होतो, सध्या महसुली पंधरवाड्यामध्ये शासनाने शेत रस्ता या विषयाला विशेष महत्व दिले असून त्याची अंमलबजावणी करण्यासाठी विशेष मोहीम राबवण्याचे काम सुरु झाले आहे.
छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियाना अंतर्गत राष्ट्र नेता पंतप्रधान मा. श्री.नरेंद्र मोदी यांचे जन्म दिनांक 17 सप्टेंबर 2025 ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती दिनांक 2 ऑक्टोबर 2025 या कालावधीमध्ये पूर्ण राज्यामध्ये महसूल पंधरवाडा साजरा करण्याचे शासनाने ठरवले आहे.

हा महसूल पंधरवाडा एकूण तीन टप्प्यांमध्ये साजरा केला जाणार आहे त्यातील पहिला टप्पा 17 सप्टेंबर ते 22 सप्टेंबर 2025 हा शिव पाणंद रस्ते सीमांकन कार्यक्रम होणार आहे. राज्यातील ग्रामीण भागातील ग्रामीण रस्ते, हद्दीचे ग्रामीण रस्ते, ग्रामीण गाडी मार्ग, पाय मार्ग, शेतावर जाण्याचे पाय मार्ग व गाडी मार्ग, शेत पांदण रस्त्याचे अभिलेख अद्यावत करणे, रस्त्यांना विशिष्ट क्रमांक देणे इत्यादी कामे होणार आहेत.
सिंदखेड राजा मध्ये महसुली पंधरवाड्याचा पहिला टप्पा उत्साहात साजरा होत आहे, मा. उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच मा. तहसीलदार अजित दिवटे यांच्या नियोजनाखाली एकूण सात महसूली मंडळामधील प्रत्येकी एक गाव अशी एकूण सात गावामध्ये या पहिल्या टप्प्यातील पाणंद रस्ते सीमांकन कार्यक्रम पार पाडण्याचे योजिले आहे.
भूमी अभिलेख कार्यालय मार्फत रस्ते सिमांकणासाठी या सात महसूली मंडळातील सात गावांसाठी प्रत्येकी 3 कर्मचाऱ्यांचे दोन पथक तयार करण्यात आले असून त्यांना गावांचे वाटप सुद्धा करण्यात आले आहे. भूमी अभिलेख विभागाने दिनांक 20 सप्टेंबर ला मौजे उगला, 21 सप्टेंबर रोजी राहेरी बुद्रुक, पिंपळगाव लेंढी, पळसखेड चक्का, 22 सप्टेंबर रोजी मोहाडी, शेंदुर्जन आणि 23 सप्टेंबर रोजी निमखेड, मलकापूर पांग्रा अश्या एकूण सात गावाचे नियोजन केल्याचे मा. उपअधीक्षक भूमी अभिलेख सिंदखेड राजा मारोती थोरवे यांनी सांगितले आहे.
आज दिनांक 20 सप्टेंबर 2025 रोजी त्यांचे एक पथक मौजे उगला येथे रस्ते सीमांकणासाठी हजर झाले होते. या पथकामध्ये भुमापक प्रकाश शिंदे, भुमापक श्रीकांत बुलबुले, सय्यद शोएब हजर होते. उगला गावचे ग्राम महसूल अधिकारी राहुल देशमुख यांनी नियोजन करून एकूण 12 शिव पाणंद रस्ते सिमांकणासाठी निवड करून त्याबद्दलची सर्व माहिती भूमी अभिलेख विभागाला दिली होती. या सर्व रस्त्याचे सीमांकण अत्याधुनिक रोवर यंत्राच्या माध्यमातून होत असून सीमांकन केलेले सर्व पॉईंट्स हे सॅटेलाईटच्या माध्यमातून जतन केले जाणार आहेत.
सध्या आपल्या सिंदखेडराजा तालुक्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये अतिवृष्टी झाली आहे, रस्ते सीमांकन करतेवेळी आपल्या सर्व कर्मचारी यांनी तसेच गावाचे सरपंच अभिमान उगले यांनी खूप मेहनतीने आपल्यावर असलेली कामाची जबाबदारी अगदी प्रामाणिकपणे पार पाडली. गुडघाभर पाण्यामधून, चिखलामधून, झाडी झूडपामधून या सर्वानी काम करून एका दिवसात विक्रमी कामगिरी पार पाडली त्याबद्दल मा. उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे यांनी तसेच मा. तहसीलदार अजित दिवटे यांनी सर्व कर्मचाऱ्यांचे कौतुक केले.
मंडळ अधिकारी टेकाळे साहेब, सरपंच- अभिमान उगले, महसूल सह्ययक- राजेश जाधव, तसेच आपले शेतकरी बांधव पुरूषोत्तम उगले, हरिभाऊ उगले, सतीश उगले, गजानन उगले, सोपान उगले, रामभाऊ उगले इत्यादी सर्व शेतकऱ्यांनी खूप सहकार्य केले त्यामुळे काम करायला सर्वांना आनंददायी वातावरण मिळाले.

