चिखलीत एसबीआयचे एटीएम फोडले; दहा लाख रुपयांच्या चोरीचा संशयगुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु…शेटर बंद असल्याने चोरी उघडकीस येण्यास उशीर…
चिखली (एकनाथ माळेकर): शहरातील राऊतवाडी परिसरात असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाचे एटीएम अज्ञात चोरट्यांनी फोडल्याची घटना समोर आली आहे. दि.२० सप्टेंबर च्या मध्यरात्री घडलेल्या या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. एटीएममध्ये तब्बल दहा लाख रुपयांची रोकड असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. मात्र नेमकी किती रक्कम चोरीला गेली आहे याची माहिती अद्याप समोर आलेली नाही.
आज दुपारी तीन वाजताच्या सुमारास ही घटना स्थानिकांच्या निदर्शनास आली आणि त्यानंतर पोलिसांना याची माहिती देण्यात आली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली असून, डॉग स्कॉड आणि ठसे तज्ज्ञांना पाचारण करण्यात आले आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू आहे.
चोरांनी अत्यंत सफाईदारपणे ही चोरी केली आहे. त्यांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांवर काळ्या रंगाचा स्प्रे मारून ते निकामी केले. त्यामुळे तपास यंत्रणांसमोर एक मोठे आव्हान उभे राहिले आहे. बँकेचे अधिकारी एटीएममधील शिल्लक रक्कम आणि ग्राहकांनी काढलेली रक्कम याची तपासणी करत आहेत, त्यानंतरच नेमकी किती रोकड चोरीला गेली याचा आकडा स्पष्ट होईल. पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
