येळगंगा धरणाचे स्वयंचलित दरवाजे पुन्हा उघडले,नदीकाठच्या शेतात पाणीचपाणी!सवणा येथे आंदोलन.प्रशासनाच्या अश्वासनामुळे विनायक सरनाईक,नितीन राजपूत यांचे आंदोलन पाच तासानंतर स्थगीत….
चिखली( निलेश कोल्हे )चिखली बुलढाणा तालुक्यात ढगफुटीसदृश पाऊस होत असल्याने बुलढाणा शहराला पाणी पुरवठा करणारे येळगाव धरण पूर्णक्षमतेने भरले आहे. त्यामुळे या धरणाचे स्वयंचलित गेट पाण्याच्या दाबामुळे अचानक उघडले गेले असून, मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग पैनगंगा नदीत सुरू झाल्याने नदीकाठच्या येळगाव,सव,किन्होळा,सवणा,सोमठाणा,दिवठाणा,पेठ,बोरगाव,पांढरदेव यासह इतर गावातील शेतकर्यांच्या शेतात पाणी शिरले असून, शेतीसह पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे.त्यामुळे संतप्त झालेले शेतकऱ्यांनी या भागाची पाहणी करण्यासाठी व दिलासा देण्यास कूणी आले नसल्याने विनायक सरनाईक व नितीन राजपूत यांच्या नेतृत्वात सवणा येथे शेतातच आंदोलन सुरू केले.यावेळी पैनगंगा नदिकाठच्या शेतकऱ्यांचे शेतीपिकाचे पुराचे पावसाने नुकसान होवू नये यासाठी येळगाव धरणावरील स्वयंचलीत गेटसाठी उपाययोजना करण्यात याव्यात,जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करण्यात यावा,नदिकाठच्या शेतकऱ्यांना वाढिव नुकसान भरपाई देण्यात यावी,यासह विविध मागण्या करण्यात आल्या आंदोलनकर्ते आक्रमक झाल्याचे बघता ठाणेदार,नायब तहसिलदार यांच्या मध्यस्तीने आंदोलन पाच तासानंतर स्थगीत करण्यात आले.येळगाव धरणाच्या स्वयंचलीत गेट संदर्भात आमदार सौ महाले यांनी सुद्धा पालकमंत्री, जिल्हाधिकारी व संबंधित विभागाचे अधिकारी यांच्यासमवेत शेतकऱ्यांची बैठक लावून तोडगा काढण्याचे ठोस अश्वासन दिल्याने आंदोलन स्थगीत करण्यात आले आहे.मात्र गेल्या पाच ते सात वर्षांपासूनची समस्या निकाली न निघाल्यास येळगाव धरणात आंदोलन छेडू असा इशारा विनायक सरनाईक, नितिन राजपुत,सतिष सुरडकर,विलास वसू,शिवाजी देव्हडे,प्रल्हाद देव्हडे,या़च्यासह आदिंनी निवेदनाव्दारे दिला आहे.तर याच मागण्यांसाठी येळगाव येथील शेतकऱ्यांनी सुद्धा जिल्हाधिकारी यांना निवेदन देत आंदोलन सुरू केले होते.दरम्याण जिल्हाधिकारी यांनी सुद्धा उपाययोजना करु असे अश्वासन शेतकऱ्यांना दिले असल्याचे सांगितले जात आहे
दि२२सप्टेंबर रोजी बुलढाणा तालुक्यात मुसळधार पाऊस पडल्याने अगोदरच शंभर टक्के भरलेल्या येळगाव धरणाचे गोडबोले स्वयंचलीत गेट एकाचवेळी खुले झाल्यामुळे बुलढाणा,चिखली तालुक्यातील पैनगंगा नदीकाठच्या शेतकर्यांच्या शेतामध्ये पुराचे पाणीच पाणी तुंबले असून, शेतकर्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. गेल्या चार ते पाच वर्षांपासून शेतकरी येळगाव धरणावरील सांडव्यातील स्वयंचलीत गेट मानवचलीत करण्यात यावे,धरणाला सांडवा करण्यात यावा, त्याचप्रमाणे सांडवा म्हणून किमान पाच ते आठ गेट पावसाळ्यात कायमस्वरूपी खुले ठेवण्यात यावे,जेणेकरून तलावातील पाण्याचा विसर्ग सुरू राहील,आणि एकाच वेळी स्वयंचलीत ८० दरवाज्यावर पाण्याचा दाब तयार होवून ते खुलणार नाही.याबाबत विनायक सरनाईक व नितीन राजपूत यांनी येळगाव धरणाखालील शेतजमिनीचे व शेतीपिकाचे होणारे नुकसान टाळण्यासाठी येळगाव धरणावरील स्वयंचलीत गेट काढून नैसर्गिक सांडवानिर्मिती करण्याची मागणी पैनगंगा नदीकाठच्या शेतजमीनधारक शेतकर्यांसह दि. १३/०५/२०२५ रोजी जिल्हाधिकारी बुलढाणा यांच्याकडे केली होती. यावर तात्पुरता उपाय म्हणून गेट खुले ठेवल्यास पीक नुकसानीपासून वाचू शकते, या आधारावर पावसाळ्याच्या दिवसांमध्ये पुराच्या पाण्याचा धोका लक्षात घेता येळगाव धरणाचे ८० स्वयंचलीत गोडबोले गेट पैकी ०४ गेट उघडे ठेवण्याची दक्षता नगरपरिषद मार्फत घेण्यात येईल, असे लेखी पत्र मुख्याधिकारी नगरपरिषद बुलढाणा यांनी जिल्हा सहआयुक्त (न.वि.शा) जिल्हाधिकारी कार्यालय बुलढाणा यांना दिले होते. मात्र लेखी दिलेले असतांनासुद्धा गेट पावसाळ्याचे दिवस आणि पावसाचा अंदाज असून सुद्धा कायमस्वरुपी खुले ठेवले नसल्याने ८० स्वयंचलीत गेटवर पाण्याचा दाब तयार होवून अनेक दरवाजे एकाचवेळी खुले झाल्याने नदीपात्रातील पाणी हे पैनगंगा नदीकाठच्या शेतकर्यांच्या शेतात घुसल्याने शेतकर्यांच्या शेतीपिकाचे नुकसान झाले आहे. या संपूर्ण नुकसानीस जिल्हा प्रशासन जबाबदार असल्याचा आरोप शेतकर्यांनी करीत याबाबतच्या विविध मागण्यांसाठी सवणा येथील शेतामध्ये आंदोलन सुरू केले होते.या आंदोलनाची खळबळ उडाल्याने येळगाव येथील तलावाच्या पायथ्याशी शेती असलेल्या शेतकऱ्यांनी सवणा येथील आंदोलनाला पाठींबा दर्शवीत आंदोलन सुरू केले होते.आंदोलनाची तिव्रता व नदिकाठचे शेतकरी आक्रमक होत असल्याचे बघून ठाणेदार संग्राम पाटिल,तहसिलदार काकडे यांनी नायब तहसीलदार गायकवाड यांना आंदोलनकर्ते यांची भेट घेतली याबाबत समजूत काढली तुमच्या मागण्यांचे सविस्तर निवेदन द्या आम्ही तोडगा काढू असे अश्वासन दिल्याने याबाबत चिखली तहसिलदार यांना सवणा येथील शेतकऱ्यांनी निवेदन दिले तर जिल्हाधिकारी यांना येळगाव येथील शेतकऱ्यांनी निवेदन दिले आहे.
तोडगा काढु आमदार महालेंकडून शेतकऱ्यांना अश्वासन…
या आंदोलनाची माहिती आमदार महाले यांना मिळाल्याने त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला तर यावर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याचे दृष्टीने दि२५सप्टेंबर रोजी पालकमंत्री हे बुलढाणा येथे असणार आहेत दरम्यान संबंधित अधिकारी शेतकऱ्यांची बैठक घेऊन यावर चर्चा घडुन आणु असे अश्वासन आमदार महाले यांनी सवणा येथील पुरग्रस्त भागाची पाहणी करतांना व आंदोलना दरम्याण विनायक सरनाईक यांना भ्रमनध्वनीव्दारे चर्चा करतांना दिले आहे.
