टिटवी येथे मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानास प्रारंभमूलभूत सुविधा प्रभावीपणे उभारल्या गेल्या पाहिजे — तहसीलदार भूषण पाटील

Screenshot_2025-09-25-17-42-29-33_3a637037d35f95c5dbcdcc75e697ce91

लोणार (यासीन शेख) राज्यात १७ सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत गावांच्या सर्वांगीण विकासासाठी महत्त्वपूर्ण काम करण्याची संधी उपलब्ध होणार असून सरपंचांनी या अभियानात सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन तहसीलदार भूषण पाटील यांनी आदिवासी बहुल टिटवी येथे आयोजित विशेष सभेत केले.

या वेळी तहसीलदार पाटील म्हणाले की, “राज्य शासन ग्रामीण भागातील विकासासाठी विविध योजना राबवत आहे. या अभियानादरम्यान आवास योजनेची उद्दिष्टे पूर्ण करणे, ग्रामस्वच्छता टिकवणे, सुंदर शाळांची उभारणी, महिलांच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्ही यंत्रणा बसविणे, सौरऊर्जेचा व्यापक वापर करणे, महिला बचतगटांचे सक्षमीकरण अशा विविध क्षेत्रांत ठोस व परिणामकारक कामगिरी करणे ही ग्रामपंचायतींची जबाबदारी आहे.”
महा-ई-सेवा केंद्रांमार्फत मिळणाऱ्या सेवा व दाखल्यांवरील शुल्कातून जमा होणाऱ्या निधीपैकी ३० टक्के निधी ग्रामपंचायतींना दिला जातो. या निधीचा उपयोग ग्रामविकास कामांसाठी व्हावा, याकडे सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांनी विशेष लक्ष द्यावे. त्याचबरोबर गावातील पाणीपुरवठा, स्वच्छता व शाळा दुरुस्ती यांसारख्या मूलभूत सुविधा प्रभावीपणे उभारल्या गेल्या पाहिजेत, असेही त्यांनी स्पष्ट केले.

या विशेष सभेत गावच्या सरपंचा श्रीमती अनुसया नरवाडे यांनी आपल्या गावाच्या विकासासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याची ग्वाही दिली. उपसरपंच भगवान कोकाटे यांनी या अभियानामुळे गावात रोजगारनिर्मिती तसेच महिला व युवकांना नवीन संधी उपलब्ध होतील, असा विश्वास व्यक्त केला. मंडळ अधिकारी विजय पोफळे यांनी अभियानाची अंमलबजावणी करताना शासकीय योजनेची माहिती प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचविण्याचे महत्त्व अधोरेखित केले.

ग्रामपंचायत सदस्यांनीही ग्रामविकासाच्या विविध योजना प्रत्यक्ष राबविण्यासाठी एकत्रितपणे प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले. ग्रामस्थांच्या प्रश्नांना उत्तर देताना तहसीलदार पाटील यांनी शासन योजनांचा पारदर्शक व कार्यक्षम वापर होईल याची ग्वाही दिली.

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानामुळे टिटवीसह संपूर्ण तालुक्यात विकासाचा नवा अध्याय सुरू होईल, असा विश्वास या सभेमुळे ग्रामस्थांत व्यक्त झाला.

You may have missed

error: Content is protected !!