गुंजाळा येथील 25 वर्षीय युवकाची आत्महत्या; परिसरात खळबळतरुण वयात जीवन संपवण्याचा टोकाचा निर्णय, गावकऱ्यांमध्ये हळहळ.

IMG-20250927-WA0000

चिखली( एकनाथ माळेकर)तालुक्यातील गुंजाळा येथे एका 25 वर्षीय युवकाने निंबाच्या झाडाला दोरीने फाशी घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली व वेगवेगळ्या चर्चांना पेव फुटले असून आत्महत्येचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट आहे. मृतकाचे नाव संतोष शंकर केदार (वय 25 वर्षे) असून, तो गुंजाळा (ता. चिखली) जिल्हा बुलढाणा येथील रहिवासी होता. सदर घटना आज, शुक्रवार दिनांक 26 सप्टेंबर 2025 रोजी दुपारी 3 वाजेच्या सुमारास उघडकीस आली.

गुंजाळा येथील शेतकरी शांताराम मोरे यांच्या शेतात लिंबाच्या झाडाला दोरीने फाशी घेतलेल्या अवस्थेत संतोषचा मृतदेह आढळून आला होता. स्थानिकांनी ही घटना पाहिल्यानंतर पोलिसांना माहिती दिली व अंढेरा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह ताब्यात घेतले व सदर मृतदेहाचे उपजिल्हा रुग्णालय, चिखली येथे शवविच्छेदन केले.

संतोषने आत्महत्या का केली याबाबत अद्याप कोणतीही ठोस माहिती समोर आलेली नाही. कुटुंबीय, नातेवाईक आणि स्थानिकांमध्ये याबाबत वेगवेगळ्या चर्चा सुरू असून, काहींनी कौटुंबिक तणाव, आर्थिक अडचणी किंवा वैयक्तिक कारणांचा अंदाज व्यक्त केला आहे. मात्र, पोलिसांनी आत्महत्येच्या कारणाचा शोध घेण्यासाठी तपास सुरू केला आहे. आत्महत्येच्या कारणा बाबत कोणताही ठोस पुरावा मिळालेला नसल्याने पोलिस सर्व शक्यतांचा विचार करत आहेत. संतोषच्या अकाली निधनाने गुंजाळा गावात शोककळा पसरली असून तरुण वयातच त्याने जीवन संपवण्याचा टोकाचा निर्णय घेतल्याने गावकऱ्यांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.

अंढेरा पोलीस प्रकरणाचा सखोल तपास करत असून पुराव्यांच्या आधारे आत्महत्येचे नेमके कारण शोधण्याचा प्रयत्न करत आहेत.

You may have missed

error: Content is protected !!