पालकमंत्री ना. मकरंद पाटील यांची अतिवृष्टीग्रस्त भागाची पाहणी ….
बुलढाणा (बुलढाणा माझा न्युज)राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. मकरंद पाटील यांनी आज बुलडाणा तालुक्यातील नळकुंड तसेच मलकापूर तालुक्यातील दाताळा, जांबुळ धाबा येथील अतिवृष्टीग्रस्त भागाला भेट देत शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन थेट पाहणी केली.यावेळी पालकमंत्र्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांना धीर दिला व आश्वासन दिले की,”नैसर्गिक आपत्तीमुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांच्या पाठीशी राज्य शासन खंबीरपणे उभे आहे. सप्टेंबर महिन्यात झालेल्या नुकसानीचे पंचनामे तात्काळ पूर्ण करून नुकसान भरपाई लवकरच वितरित केली जाईल. शेतकऱ्यांनी खचून जाऊ नये, शासन तुमच्या सोबत आहे.”
तसेच त्यांनी नद्याजवळ खरडून गेलेल्या जमिनी, वाहून गेलेले शेतीपूरक साहित्य, जनावरे आणि पडझड झालेली घरे यांची नोंद घेऊन मदतीसाठी प्रस्ताव तातडीने पाठविण्याचे निर्देश दिले.
या पाहणीदरम्यान आ. चैनसुख संचेती, आ. संजय गायकवाड, आ. मनोज कायंदे, जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाबराव खरात यांच्यासह संबंधित अधिकारी, कर्मचारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
