श्री पुंडलिक महाराज महाविद्यालयात रासेयोच्या वतीने “एकात्म मानवदर्शन” या विषयावर प्रेरणादायी व्याख्यानाचे आयोजन

IMG-20250930-WA0004

बुलढाणा ( बुलढाणा माझा न्युज)श्री पुंडलिक महाराज महाविद्यालय, नांदुरा रेल्वे, जि. बुलडाणा येथे राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने गुरुवार, दि. २५/०९/२०२५ रोजी पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंती निमित्ताने “एकात्म मानवदर्शन” या विषयावर एक विशेष अतिथी व्याख्यानाचे आयोजन महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. अलका मानकर यांच्या मार्गदर्शनात रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा. शांताराम भोये आणि सह-कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. अमोल निपटे यांनी आयोजित केले होते. या कार्यक्रमासाठी अध्यक्ष प्रा. प्रशांत बोर्डे, तर प्रमुख वक्ते म्हणून प्रा. डॉ. रविकुमार शिंदे व प्रा. अतुल इंदाने हे उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात महामानवांच्या प्रतिमांचे पूजन व माल्यार्पणाने झाली. प्रा. डॉ. निपटे यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना सादर करताना पंडित दीनदयाळ उपाध्याय यांची जयंती साजरी करण्यामागचा उद्देश स्पष्ट केला.
प्रमुख वक्ते डॉ. रविकुमार शिंदे यांनी आपल्या सखोल व्याख्यानातून एकात्म मानवदर्शन या विषयाची सविस्तर मांडणी केली. त्यांनी सांगितले की, एकात्म मानवदर्शन ही संकल्पना भारतीय संस्कृतीची मूळ आत्मा आहे. या तत्त्वज्ञानामध्ये मानवाच्या सर्वांगीण विकासाचा विचार असून समाज, राष्ट्र आणि निसर्ग यांच्यातील समन्वय, सहअस्तित्व आणि मूल्याधिष्ठित जीवनपद्धती यावर भर दिला जातो. आधुनिक काळातील सामाजिक, आर्थिक आणि राजकीय संदर्भात एकात्म मानवदर्शनाची उपयुक्तता स्पष्ट केली. त्यांनी विद्यार्थ्यांना आवाहन केले की त्यांनी पंडित दीनदयाळ उपाध्याय यांचे विचार आत्मसात करावेत आणि समाजप्रेम, राष्ट्रसेवा यासाठी झटावे. कार्यक्रमात प्रा. अतुल इंदाणे यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करतांना पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जीवनकार्यावर सविस्तर प्रकाश टाकला. त्यांनी सांगितले की, पंडित दीनदयाळ उपाध्याय हे भारतीय विचारपरंपरेचे अभ्यासक होते. त्यांनी ‘एकात्म मानवदर्शन’ ही संकल्पना मांडून भारतीय समाजाला एक नवा दृष्टिकोन दिला. त्यांच्या विचारांचा गाभा म्हणजे मानवकेंद्री, मूल्याधिष्ठित आणि सर्वसमावेशक विकास.
आपल्या अध्यक्षीय भाषणात प्रा. प्रशांत बोर्डे यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करतांना पंडित दीनदयाळ उपाध्याय यांचे विचार केवळ राजकीय नव्हे, तर सामाजिक आणि नैतिकदृष्ट्याही महत्त्वपूर्ण असल्याचे सांगितले. आजच्या तरुणांनी विचारप्रधान समाजाची निर्मिती करण्यासाठी सज्ज राहिले पाहिजे. एकात्म मानवदर्शन हे तत्त्वज्ञान आपणास सर्वांगीण विकास आणि समाजकल्याणाची दिशा दाखवते, असे सांगत त्यांनी विद्यार्थ्यांना समाजासाठी सकारात्मक योगदान देण्याचे आवाहन केले. तसेच त्यांनी राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून होत असलेल्या उपक्रमांचे कौतुक केले आणि पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन रासेयो स्वयंसेवक कार्तिक डामरे याने अत्यंत उत्कृष्टपणे केले. रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा. शांताराम भोये यांनी आभारप्रदर्शन करत सर्व मान्यवरांचे व उपस्थित रासेयो स्वयंसेवकांचे मनःपूर्वक आभार मानले.

You may have missed

error: Content is protected !!