कुंबेफळ नगरीत सिमेंट रस्त्याचे भव्य उद्घाटन…..

IMG-20251003-WA0012

बिबी( ब्रम्हानंद वाकोडे ) सिंदखेडराजा तालुक्यातील कुंबेफळ नगरी येथे दसरा व धम्मचक्र दिनाचे औचित्य साधून सिमेंट रस्त्याचे भव्य उद्घाटन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून कुंबेफळ नगरीचे सरपंच पती तसेच मनसे परिवहन महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष कार्यसम्राट जनसेवक राजेश इंगळे उपस्थित राहिले.

कार्यक्रमाचे उद्घाटन माजी सरपंच लक्ष्मणराव दत्तूजी फड यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी जेष्ठ नेते पाटीलबा आंधळे मामा, माजी सरपंच शंकररावजी कांगणे, शरद भाऊ पवार, सुनीलजी कांगणे, प्रकाश आडे महाराज, अशोकरावजी नामदेव फड, गजानन इंगळे, प्रभाकर फड आदी मान्यवर विशेष उपस्थित होते.

ग्रामपंचायत उपसरपंच, सर्व सदस्य, ग्रामविकास अधिकारी जाधव साहेब तसेच ग्रामपंचायत कर्मचारी व समस्त गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रम भव्यतेने साजरा झाला.

यावेळी जेष्ठ नेते आंधळे मामा यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, “गावाच्या विकासासाठी राजेश इंगळे यांनी मोठ्या प्रमाणावर कामे केली असून, त्यांच्या नेतृत्वाखाली ग्रामपंचायतीची कामगिरी अधिक गतिमान झाली आहे. आज उद्घाटन झालेला सिमेंट रस्ता हे त्याचे उत्तम उदाहरण आहे. भविष्यातही इंगळे गावाच्या सर्वांगीण विकासासाठी अशाच प्रकारे काम करत राहतील, असा विश्वास आहे.”

सरपंच पती राजेश इंगळे यांनी आपल्या भाषणात गावातील विकासकामे हीच खरी जनसेवा असून प्रत्येक ग्रामस्थांच्या सहकार्यानेच ती पूर्णत्वास जातील, असे सांगून गावकऱ्यांचे आभार मानले.

दसरा व धम्मचक्र दिनाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या सोहळ्यामुळे गावात उत्साहाचे व विकासाचे वातावरण निर्माण झाले.

You may have missed

error: Content is protected !!