शेतकऱ्यांसाठी वनविभाग कर्मचाऱ्यांचा पुढाकार — एक दिवसाचे वेतन मुख्यमंत्री सहाय्यता निधीकडे!

IMG-20251008-WA0044


सिंदखेडराजा (अनिल दराडे) राज्यात झालेल्या अतिवृष्टी, ढगफुटी आणि नैसर्गिक आपत्तींमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, अनेक कुटुंबे अन्नधान्य, निवारा आणि आर्थिक संकटाला सामोरी जात आहेत. अशा कठीण प्रसंगी बुलडाणा वनविभागातील वनरक्षक व वनपाल कर्मचाऱ्यांनी एक दिवसाचे वेतन मुख्यमंत्री सहाय्यता निधीकडे जमा करण्याचा निर्णय घेतला आहे.
शेतकऱ्यांना मदतीचा हात,संवेदनशील वनकर्मचारी वर्ग पुढे सरसावला
फॉरेस्ट अ‍ॅण्ड फॉरेस्ट गार्ड्स असोसिएशन, शाखा बुलडाणा (ठाणे) च्या वतीने मा. उपवनसंरक्षक, बुलडाणा यांच्याकडे करण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, “वनपरिक्षेत्र स्तरावर नाहरकत प्रमाणपत्र घेऊन एक दिवसाचे वेतन कपात करून मुख्यमंत्री सहाय्यता निधीकडे जमा करण्यात यावे.”
या उपक्रमात सर्व वनरक्षक व वनपाल कर्मचारी स्वेच्छेने सहभागी होत असून, ही मदत आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांसाठी एक सकारात्मक उदाहरण ठरेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.
या निवेदनात असोसिएशनने सरकारकडे एक महत्त्वाची विनंती केली आहे की, “जर शासनाने स्वतंत्रपणे सर्व कर्मचाऱ्यांचे वेतन कपात करण्याचा निर्णय घेतला, तर आम्ही आधीच दिलेले वेतनच अंतिम मानण्यात यावे, व पुन्हा वेतन कपात करण्यात येऊ नये.”
यातून कर्मचार्‍यांची ईच्छाशक्ती आणि पारदर्शकता स्पष्ट दिसून येते.
यामध्ये संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचा विशेष पुढाकार असून, अध्यक्ष गजानन पोटे, उपाध्यक्षा वरात, कोषाध्यक्ष व इतर प्रमुख सदस्य यांनी एकत्र येत ही प्रस्तावना मा. उपवनसंरक्षक यांच्याकडे सादर केली.
बुलडाणा वनविभागातील कर्मचाऱ्यांनी दाखवलेली ही सामाजिक बांधिलकी संपूर्ण राज्यातील इतर विभागांसाठी आदर्श ठरेल, अशी भावना स्थानिक पातळीवर व्यक्त होत आहे.

You may have missed

error: Content is protected !!