मेहकर–लोणारच्या शेतकऱ्यांना अखेर दिलासा; रविकांत तुपकर यांच्या पाठपुराव्याला यश – ८९ कोटी ४६ लाखांची नुकसानभरपाई वाटपास सुरुवात,मेहकर लोणार तालुके अतीवृष्टीतून वगळल्यानंतर तुपकर यांनी दिला होता आंदोलनाचा इशारा

IMG-20251025-WA0019

मेहकर (बुलढाणा माझा न्युज) जून ते सप्टेंबर महिन्यात मेहकर आणि लोणार तालुक्यात झालेल्या अतीवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले होते. ढगफुटी सदृश्य पावसामुळे सोयाबीन, कापूस, तुर, भुईमूग तसेच फळबागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. काही ठिकाणी शेतजमिनी खरडून गेल्या, तर काही ठिकाणी पाण्यामुळे शेतात गाळ साचला. हाता-तोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला आणि शेतकरी आर्थिक संकटात सापडला. या भीषण परिस्थितीत सुद्धा शासनाने जाहीर केलेल्या अतिवृष्टीग्रस्त तालुक्यांच्या यादीत मेहकर आणि लोणारचा समावेश नव्हता. या निर्णयाविरोधात शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी तीव्र भूमिका घेत आंदोलनाचा इशारा दिला. त्यांनी जिल्हाधिकारीमार्फत मुख्यमंत्री यांना निवेदन देत दोन्ही तालुक्यांचा समावेश करण्याची मागणी लावून धरली. तुपकर यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतर अखेर शासनाला निर्णय बदलावा लागला आणि मेहकर व लोणार तालुक्यांचा समावेश अतिवृष्टीग्रस्त तालुक्यांमध्ये करण्यात आला.
सरकारने मंजूर केलेल्या नुकसानभरपाईचा निधी आता शेतकऱ्यांच्या खात्यांवर जमा होऊ लागला आहे. मेहकर तालुक्यातील ६० हजार ८१४ शेतकऱ्यांच्या खात्यात ५० कोटी ८६ लाख २९ हजार रुपये जमा झाले आहेत, तर लोणार तालुक्यातील ४२ हजार ७९८ शेतकऱ्यांच्या खात्यात ३८ कोटी ६३ लाख रुपये वळते करण्यात आले आहेत. अशा प्रकारे दोन्ही तालुक्यांतील एकूण १ लाख ३ हजार ६१२ शेतकऱ्यांच्या बँक खात्यात ८९ कोटी ४६ लाख रुपयांची नुकसानभरपाई जमा झाली आहे. हा दिलासा मिळण्यात रविकांत तुपकर यांच्या आंदोलनात्मक भूमिकेचा आणि सातत्यपूर्ण पाठपुराव्याचा मोठा वाटा असल्याचे शेतकरी वर्तुळात बोलले जात आहे.जिल्ह्यात एकूण ३४३ कोटी रुपयांचा निधी वाटपासाठी उपलब्ध करण्यात आला असून, तुपकर यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे ही प्रक्रिया गतीमान झाली आहे. काही शेतकऱ्यांचा निधी फार्मर आयडी व ई-केवायसी प्रक्रियेअभावी अडकला आहे. त्यामुळे त्यांनी ही प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्याचे आवाहन शेतकरी नेते तुपकर यांनी केले आहे.तुपकर यांच्या आंदोलनाचा इशारा दिल्यामुळे प्रशासन आणि सरकार ने दखल घेत मेहकर–लोणार या तालुक्यांचा समावेश केला त्यामुळे मदत निधी मिळत असल्याची प्रतिक्रिया स्थानिक शेतकऱ्यांनी दिली

You may have missed

error: Content is protected !!