बुलढाण्याचा अभिमान — वैभव भुतेकर!शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) प्रवक्ता ॲड. जयश्री शेळके यांच्याकडून वैभव भुतेकर यांचा गौरवपूर्ण सत्कार

IMG-20251029-WA0026

बुलढाणा (बुलढाणा माझा ):- महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या राज्यसेवा परीक्षा २०२४ मध्ये राज्यात दुसरा क्रमांक मिळवून बुलढाणा जिल्ह्याचे नाव उजळवणारे वैभव बबनराव भुतेकर (रा. पाडळी, ता. बुलढाणा) यांचा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या प्रवक्ता ॲड. जयश्री शेळके यांनी त्यांच्या निवासस्थानी भेट देऊन मनःपूर्वक सत्कार केला.या प्रसंगी वैभव यांची आई, नातेवाईक तसेच मित्रपरिवार उपस्थित होता. घरगुती आणि भावनिक वातावरणात झालेल्या या भेटीने सर्वांच्या मनात अभिमान आणि प्रेरणेची नवी ज्योत प्रज्वलित झाली.वैभव भुतेकर यांनी ग्रामीण भागातील मर्यादित साधनांमध्ये राहून स्वबळावर MPSC राज्यसेवा परीक्षा उत्तीर्ण केली. त्यांच्या या यशामागे त्यांची मेहनत, आईचे आशीर्वाद आणि दिवंगत वडिलांचे संस्कार हेच बळ ठरले. कुटुंबाच्या परिस्थितीशी झुंज देत त्यांनी हे यश संपादन केले असून, हे यश प्रत्येक ग्रामीण युवकासाठी प्रेरणादायी उदाहरण ठरले आहे.

या प्रसंगी बोलताना ॲड. जयश्री शेळके म्हणाल्या, “वैभवसारखे विद्यार्थी महाराष्ट्राचे भविष्य घडवतात. त्यांनी परिश्रम, शिस्त आणि आत्मविश्वासाच्या जोरावर सिद्ध केले की यश मिळवण्यासाठी साधनांची नव्हे, तर चिकाटीची गरज असते. दिवंगत वडिलांच्या आशीर्वादाने आणि आईच्या प्रेरणेने वैभवने हे साध्य केले. तो संपूर्ण बुलढाण्याचा अभिमान आहे.”

सत्कारावेळी वैभव यांच्या आईंच्या चेहऱ्यावरून समाधान, अभिमान आणि हळव्या आठवणी झळकत होत्या. त्यांनी सांगितले, “वैभवने आपल्या वडिलांचे स्वप्न पूर्ण केले आहे. हे यश आमच्या कुटुंबासाठी भावनिक क्षण आहे.”

वैभव भुतेकर यांचे यश हे सिद्ध करते की — “जिथे इच्छा, तिथे मार्ग!” परिश्रम, संघर्ष आणि संस्कार यांच्या बळावर कोणतेही स्वप्न साकार करता येते. बुलढाणा जिल्ह्यातील युवकांसाठी हे यश प्रेरणादायी दीपस्तंभ ठरले असून, त्यांच्या कुटुंबाचा आणि संपूर्ण जिल्ह्याचा अभिमान वाढवणारे आहे. यावेळी गोविंद पवार, सर्जेराव भुतेकर , गजानन पवार, रवी पवार, भागवत कड सर, गणेश कड सर, पंढरी पवार, भूषण पवार, प्रमोद पवार, बाळूभाऊ भराड, विश्वनाथ भराड, सुधीर पवार इ. उपस्थित होते.

You may have missed

error: Content is protected !!