येवती सरपंचाविरोधात अविश्वास ठराव मंजूर
Oplus_16908288
लोणार (यासीन शेख )तालुक्यातील येवती सरपंच प्रयागबाई अर्जुन पाटोळे यांच्या विरोधात आठ ग्रामपंचायत सदस्यांनी दाखल केलेला अविश्वास ठराव २० जून रोजी तहसीलदार भूषण पाटील यांच्या उपस्थितीत विशेष सभेत पारीत करण्यात आला आहे.
येवती सरपंच प्रयागबाई पाटोळे या सध्याच्या कारभारात इतर सदस्यांना विचारात न घेता निर्णय घेत असल्याचा आरोप करून उपसरपंच रामेश्वर कायंदे यांच्यासह सदस्य अनिता वाघ, रामेश्वर सानप, मंदाबाई सानप, नारायण कायंदे, प्रिया खरात, लता खरात आणि रेणुका डोईफोडे यांनी अविश्वास ठराव दाखल केला होता. या अविश्वास ठरावावर २० जून रोजी ग्राम पंचायत येवती येथे पार पडलेल्या विशेष सभेत तहसीलदार भूषण पाटील यांच्या समोर मतदान घेण्यात आले. यावेळी बहुमताच्या आधारावर अविश्वास पारीत झाला असला
तरीही याबाबतचा अहवाल तहसीलदार भूषण पाटील हे जिल्हाधिकारी बुलडाणा यांना सादर करणार आहे. विशेष म्हणजे, सध्या ग्रामपंचायतीत एकूण सदस्य संख्या ९ असून, ८ सदस्यांचा स्पष्ट पाठिंबा अविश्वास ठरावाला बाजूने आहे. तर सरपंच प्रयागबाई पाटोळे यांच्या बाजूने एकच ग्रामपंचायत सदस्य दशरथ रामदास शिंदे यांनी मतदान केले. यामुळे सरपंच प्रयागबाई पाटोळे यांचं पद धोक्यात असल्याची शक्यता व्यक्त होत आहे. सरपंच प्रयागबाई पाटोळे ह्या जनतेतून निवडून सरपंच झाल्या असल्यामुळे सदस्यांनी जरी अविश्वास दाखल केला आणि तो संख्या बाळाच्या जोरावर पारित जरी झाला असला तरीही जिल्हाधिकारी हे पुढील तारीख देऊन जनतेच्या समोर विश्वास मत जाणून घेणार आहेत. त्यानंतर जर जनतेने सरपंचा प्रयागबाई पाटोळे यांच्या विरुद्ध कौल दिला तरच त्यांच्या वरील अविश्वास मंजूर होणार आहे.
