सिंदखेडराजा नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 — नामनिर्देशन प्रक्रियेला सुरुवात
सिंदखेडराजा ( अनिल दराडे)सिंदखेडराजा नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 चे बिगुल वाजले असून, मा. राज्य निवडणूक आयोगाने निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. दिनांक 4 नोव्हेंबर 2025 पासून नगरपरिषद क्षेत्रात आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली आहे.या निवडणुकीच्या अनुषंगाने मा. निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक 10 नोव्हेंबर 2025 रोजी सकाळी 10 वाजता नगरपरिषद कार्यालय, सिंदखेडराजा येथे सभा आयोजित करण्यात आली होती. सभेमध्ये नामनिर्देशन पत्र स्वीकारणे व निवडणूक प्रक्रियेबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.सभेदरम्यान प्रा. संजय खडसे यांनी अधिकाऱ्यांना खालीलप्रमाणे महत्त्वाच्या सूचना दिल्या—प्राप्त नामनिर्देशन पत्रांची तपासणी नियमानुसार व तपासणी सूचीनुसार करण्यात यावी.अर्ज प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन असल्याने ती विहित मुदतीत आणि काटेकोरपणे पार पाडावी.उमेदवारांची अनामत रक्कम जमा करून लेखा अद्यावत ठेवावा.मा. निवडणूक आयोगाला सादर करावयाची सर्व माहिती वेळेत सादर करावी.अर्जासंदर्भातील दैनंदिन अहवाल सादर करावा.उमेदवारांना आयोगाच्या सर्व सूचनांची माहिती करून द्यावी.नामनिर्देशन अर्जांची स्थिती सूचना फलकावर दररोज प्रसिद्ध करावी.आरक्षण अधिसूचनेनुसार तसेच आयोगाने दिलेल्या चिन्हांच्या यादीनुसार कार्यवाही करावी.उमेदवारांचे वय अर्जाच्या शेवटच्या दिवशी 21 वर्षांपेक्षा अधिक असणे आवश्यक आहे.प्रत्येक प्रभागात दोन मतदान केंद्र असून, एका प्रभागात तीन केंद्रे असतील.उमेदवाराने कोणत्या प्रवर्गातून अर्ज दाखल केला आहे याची खात्री करावी.आरक्षण प्रवर्गातील उमेदवारांनी जात वैधता प्रमाणपत्र अनिवार्यपणे सादर करावे.उमेदवारांकडून चिन्हासंबंधी घोषणापत्र घेतले जावे.मान्यताप्राप्त पक्षांना त्यांचे अधिकृत निवडणूक चिन्ह देण्यात यावे.A/B फॉर्मची नोंद ठेवून, A फॉर्मवर RO किंवा ARO ची स्वाक्षरी घेणे आवश्यक आहे.अर्जासोबतचे शपथपत्र नोटरीकृत असणे आवश्यक आहे.
या सभेला सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा मुख्याधिकारी डॉ. आशिष बोबडे, नायब तहसीलदार डॉ. प्रवीणकुमार वराडे, तसेच सर्व निवडणूक अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.निवडणुकीच्या प्रक्रियेअंतर्गत 10 नोव्हेंबर 2025 पासून उमेदवारांचे नामनिर्देशन पत्र स्वीकारण्यास सुरुवात झाली आहे. नगरपरिषद कार्यालयात नामनिर्देशन पत्रांची विक्री सुरू असून, उमेदवारांनी मोठ्या उत्साहाने अर्ज घेण्यास सुरुवात केली आहे.आज दिनांक 10 नोव्हेंबर 2025 पर्यंत नगरपरिषद सदस्य आणि नगराध्यक्ष पदासाठी एकही नामनिर्देशन पत्र प्राप्त झालेले नाही, तथापि 24 व्यक्तींनी एकूण 38 नामनिर्देशन पत्रे घेतली असून, 40 नागरिकांनी मतदान याद्यांच्या प्रती प्राप्त केल्या आहेत.
