जलजीवन मिशनचा जिल्ह्यात खोळंबा, नेते गप्प, योजना ठप्प, गावे कोरडीच…..
बुलढाणा( बुलढाणा माझा न्युज ) जलजीवन मिशन योजनेंतर्गत जिल्ह्यातील निम्म्यापेक्षा अधिक गावांसाठी पाणीपुरवठा योजना मंजूर आहेत. मात्र, गेल्या पाच वर्षात केवळ 100 ते 150 योजना पूर्णत्त्वास गेल्या आहेत. यातील काही योजनांच्या गुणवत्ता व दर्जावरही प्रश्न आहेत, तर उर्वरित योजनांच्या कामांना निधीअभावी ‘ब्रेक’ लागला आहे. कंत्राटदारांचे देयक अजूनही बाकी आहे निधी मिळाल्यास या योजनांची कामे वेग घेतील, अशी स्थिती आहे.या योजनेचा उद्देश प्रतिदिन प्रतिकुटुंब 55 लिटर पाणी उपलब्ध करून देणे हा आहे.2019 पासून या योजनेची अंमलबजावणी सुरू झाली. मात्र, बुलढाणा जिल्ह्यात खऱ्या अर्थाने या योजनांनी 2021-22 मध्ये वेग घेतला. जिल्ह्यातील जवळपास 900 गावांसाठी पाणीपुरवठा योजना मंजूर होत्या आणि यासाठी तब्बल 1100 कोटी रुपये मंजूर करण्यात आले होते. मात्र, प्रारंभापासूनच ही योजना या-ना त्या कारणांनी वादाच्या भोवऱ्यात अडकली. योजनेची कामेही निधीअभावी अपेक्षेप्रमाणे पुढे गेली नाहीत. सन 2024 पर्यंत योजनेची कामे पूर्ण होणे अपेक्षित होते.
रखडलेल्या कामांची जबाबदारी कोण स्वीकारणार?
पीक विमा, नैसर्गिक आपत्तीची नुकसानभरपाई मिळाल्यानंतर त्याचे श्रेय घेण्याची चढाओढ जिल्ह्यातील सत्ताधारी नेत्यांसह विरोधकांमध्येही दिसली होती, पण ग्रामपातळीवरील पाण्याच्यासंदर्भाने असलेल्या योजनांचे काम फसलेले असतांना त्याचे श्रेय नेमके कोण घेणार, हाही प्रश्न आहेच की!
