राहेरी शिवारात शेतकऱ्याची आत्महत्या — लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन केली जीवनयात्रेची अखेर!
सिंदखेडराजा (अनिल दराडे ) तालुक्यातील किनगाव राजा पोलीस स्टेशन अंतर्गत आज दि. 12 नोव्हेंबर 2025 रोजी सकाळी साडेसातच्या सुमारास राहेरी शिवारातील ताडशिवणी लिहिलेल्या पाटीजवळ एक हृदयद्रावक घटना घडली. ताडशिवणी येथील रामकिसन विश्वनाथ शितोळे (वय 53) यांनी लिंबाच्या झाडाला दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली.
या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून गावात शोककळा पसरली आहे. मृतक हे शेतकरी असून त्यांनी शेतीतूनच उपजीविका चालवली होती. घटनास्थळी मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, त्यांनी सकाळी घरून बाहेर पडून राहेरी शिवारातील पाटीजवळ गळफास घेतल्याचे आढळून आले.
याबाबत फिर्यादी भागवत शिवाजी शितोळे (वय 35, व्यवसाय-शेती, रा. ताडशिवणी, ता. सिंदखेडराजा) यांनी किनगाव राजा पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविली. त्यानुसार पोलिसांनी कायमी मर्ग क्रमांक 32/2025 कलम 194 BNSS अंतर्गत नोंद घेतली असून पुढील तपास सुरू आहे.
घटनेची माहिती मिळताच किनगाव राजा पोलीस स्टेशन चे ठाणेदार संजय मातोंडकर यांच्या आदेशानुसार पोहेका काकड (बॅ. नं. 420) व पोहेका चव्हाण (बॅ. नं. 1763) यांनी घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेऊन सरकारी दवाखान्यात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला.
मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी प्राथमिक तपासातून हे आत्महत्येचे प्रकरण असल्याचे दिसून येते.
या घटनेने ताडशिवणी आणि राहेरी परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून, “शेतीतून उदरनिर्वाह करणाऱ्या शेतकऱ्याने अशी पावले उचलावी लागणे हे दुर्दैवी आहे,” अशा प्रतिक्रिया ग्रामस्थांतून उमटत आहेत.
