जवाहर नवोदय विद्यालयाच्या प्रवेशाची परीक्षा पारदर्शक पद्धतीने राबवावी – रविकांत तुपकर,जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा व्यवस्थेबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे तुपकर यांची मागणी…!!
बुलढाणा( बुलढाणा माझा न्युज) इयत्ता सहावी प्रवेशासाठी इयत्ता पाचवी च्या मुलांची येत्या १३ डिसेंबर २०२५ रोजी आयोजित करण्यात येणारी जवाहर नवोदय विद्यालय (JNV) प्रवेश परीक्षा कोणत्याही अनियमितता, संशय किंवा गैरप्रकाराविना पार पाडण्यासाठी सखोल उपाययोजना करण्याची मागणी रविकांत तुपकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. १४ नोव्हेंबर २०२५ रोजी जिल्हाधिकारी बुलढाणा यांना दिलेल्या निवेदनात तुपकर यांनी या प्रवेश परीक्षेत मोठ्या प्रमाणात ग्रामीण व शहरी भागातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल, होतकरू आणि गुणवंत विद्यार्थी सहभागी होत असल्याने परीक्षा प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक आणि कार्यक्षम असणे अत्यावश्यक असल्याचे स्पष्ट केले. परीक्षेतील गोपनीय कामकाज, प्रश्नपत्रिका-उत्तरपत्रिकांचे व्यवस्थापन आणि केंद्र संचालन यातील प्रत्येक टप्प्यावर काटेकोर नियंत्रण देखरेख असावी, तसेच सर्व गोपनीय सामग्रीचे सुरक्षित व्यवस्थापन करावे, अशी मागणी त्यांनी केली. केंद्रांवर वेळेचे पालन करणारे, जबाबदार आणि योग्य पात्रतेचे कर्मचारी नेमण्यात यावेत, जेणेकरून परीक्षा केंद्रांचे कामकाज वेळेवर, शिस्तबद्ध आणि गैरप्रकारमुक्त पद्धतीने पार पडेल.
प्रवेश परीक्षा ही आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांच्या भविष्याशी निगडित अत्यंत संवेदनशील प्रक्रिया असल्यामुळे प्रशासनाने अधिक दक्षता घेत परीक्षेची विश्वसनीयता, पारदर्शकता आणि शिस्तबद्धता अबाधित राखणे आवश्यकआहे
निवेदनात म्हटले आहे की परीक्षेच्या वेळी क्लासेस वाले आणि पर्यवेक्षक यांच्या संगनमताने परीक्षा केंद्रामध्ये गैरव्यवहार चालतात त्याला आळा बसावा यासाठी बाह्यपर्यवेक्षकांची नियुक्ती करण्यात यावी, जेणेकरून गैरप्रकार टाळले जातील परीक्षेवेळी त्यांच्याजवळ मोबाईल नसावा शक्यतो महसुल कर्मचाऱ्यांची नियुक्ती पर्यवेक्षक म्हणून करावी असे तुपकर यांनी निवेदनात नमूद केले
या निवेदनाची प्रत जिल्हा पोलीस अधीक्षक, प्राचार्य जवाहर नवोदय विद्यालय शेगाव आणि तालुका गट शिक्षणाधिकारी यांनाही पाठवण्यात आली असून, नवोदय प्रवेश परीक्षेच्या पारदर्शकतेसंदर्भात जिल्हा प्रशासन अधिक सजग व सक्रिय होण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे. रविकांत तुपकर यांच्या या पुढाकारामुळे जिल्ह्यातील हजारो होतकरू विद्यार्थ्यांच्या हिताचे रक्षण होण्यास निश्चितच हातभार लागेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
