ग्रामीण भागात करसवलत योजना जाहीर; तढेंगाव ग्रामसभेत ‘समृद्ध पंचायत राज अभि यान’ विषयक चर्चा
सिंदखेडराजा( अनिल दराडे) राज्यातील ग्रामपंचायतींच्या थकीत करवसुलीला वेग देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने घरपट्टी, पाणीपट्टी आणि दिवाबत्ती करावर एकरकमी भरल्यास तब्बल ५० टक्के सवलत देण्याचा ऐतिहासिक निर्णय जाहीर केला आहे. ही योजना ३१ डिसेंबर २०२5पर्यंत मर्यादित असून राज्यातील सर्व जिल्हा परिषदांना तातडीने अंमलबजावणीचे आदेश देण्यात आले आहेत. अनेक ग्रामपंचायतींमध्ये करवसुली अपुरी असल्याचे शासनाच्या निदर्शनास आल्यानंतर ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान’ अंतर्गत ही विशेष करसवलत योजना राबवण्यात येत आहे.
तढेंगाव ग्रामपंचायतीत विशेष ग्रामसभा
ग्रामपंचायत तढेंगाव येथे दिनांक 21 नोव्हेंबर 2025 रोजी सरपंच मनोहर दराडे यांच्या अध्यक्षतेखाली विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले. सभेला उपसरपंच सिद्धेश्वर घुगे, सदस्य विजय दराडे, ग्रामपंचायत अधिकारी आर. आर. मेहेत्रे, ग्रामपंचायत कर्मचारी भरत सुपेकर, संतोष धारे, तसेच अंगणवाडी सेविका, आशा सेविका आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अभियान राबविण्यासंदर्भात सविस्तर चर्चा
या विशेष ग्रामसभेत ‘समृद्ध पंचायत राज अभियान’ प्रभावीपणे राबविण्यासंबंधी सविस्तर चर्चा करण्यात आली. शासनाच्या करसवलतीच्या निर्णयानुसार ग्रामपंचायतीच्या घरपट्टी, पाणीपट्टी आणि दिवाबत्ती कराची थकीत रक्कम एकरकमी जमा केल्यास ५० टक्के सवलत मिळणार असल्याची माहिती ग्रामस्थांना देण्यात आली.
अभियानाच्या कालावधीत ३१ डिसेंबरपूर्वी नागरिकांनी कर भरल्यास ग्रामपंचायतीच्या विकासकामांसाठी आवश्यक निधी उपलब्ध होईल आणि पाणीपुरवठा, दिवाबत्ती, स्वच्छता यांसारख्या मूलभूत सेवा अधिक सक्षमरीत्या पुरवता येतील, यावर सभेत भर देण्यात आला.
ग्रामस्थांना मोठा दिलासा – ग्रामसेवकांवरील ताण कमी
हजारो रुपयांची थकबाकी असलेल्या ग्रामपंचायतींना या करसवलतीचा मोठा फायदा होणार आहे. थकीत कराची वसुली न झाल्यास अधिकारी स्तरावरून होणाऱ्या दबावामुळे ग्रामसेवकांवर येणारा ताण कमी होईल आणि कामकाज सुरळीत होऊ शकणार आहे.
ग्रामपंचायतींकडे कर थकबाकी प्रलंबित आहे. त्यामुळे कर्मचारी पगार, वीजबिल आणि इतर अत्यावश्यक खर्चांवर ताण येत होता. शासनाच्या या निर्णयामुळे अशा ग्रामपंचायतींना आर्थिक सशक्तीकरण मिळणार आहे
एकंदरीत, शासनाच्या करसवलतीच्या निर्णयामुळे ग्रामीण भागातील करदात्यांना मोठा दिलासा मिळणार असून,सर्व खातेदारांनी या करसवलतीचा लाभ घ्यावा असे आवाहन ग्रामपंचायत तढेंगाव च्या वतीने ग्रामस्थांना करण्यात आले. यामुळे ग्रामपंचायतींच्या विकासकामांना नवी गती मिळणार आहे.
