तहसील कार्यालयातूनच जप्त ‘जेसीबी’ची चोरी!तहसीलदार अजित दिवटे यांनी थरारक पाठलाग करत जेसीबी,आरोपीला पकडले

IMG-20251123-WA0022

सिंदखेडराजा(अनिल दराडे)बेकायदेशीर रेती उत्खननाच्या संशयावरून जप्त करून तहसील कार्यालयाच्या आवारात ठेवलेली बिना नंबरची जेसीबी मशीन दोन आरोपींनी संगनमत करून चोरून नेण्याचा धक्कादायक प्रकार २० नोव्हेंबर रोजी दुपारी घडला. शासकीय मालमत्ताच कार्यालयाच्या आवारातून चोरीस गेल्याने महसूल व प्रशासकीय विभागात एकच खळबळ उडाली आहे.

बेकायदेशीर वाळू उत्खननासाठी वापराचा संशय

ताडशिवनी परिसरात अवैध रेती उत्खननासाठी ही जेसीबी वापरली जात असल्याच्या संशयावरून तहसील पथकाने ती काही दिवसांपूर्वी ताब्यात घेतली होती. पुढील कायदेशीर कारवाई होईपर्यंत ती जेसीबी तहसील आवारात उभी करण्यात आली होती.

सकाळी ११.३० ला आरोपीने जेसीबी पळवली

गुरुवारी, २० नोव्हेंबर रोजी सकाळी सुमारे ११:३० वाजता आरोपी जेसीबी पळवून घेऊन जात असताना, तहसील कार्यालयातील कर्मचाऱ्यांच्या लक्षात हा प्रकार आला. लगेचच माहिती तहसीलदार अजित दिवटे आणि पोलीस उपनिरीक्षक बालाजी सानप यांना देण्यात आली.

मेहकर रोडवर थरारक पाठलाग – आरोपी पकडला

तहसीलदार दिवटे आणि पीएसआय सानप यांनी तातडीने पाठलाग करून मेहकर रोडवरील जिजामाता पेट्रोल पंपाजवळ जेसीबीला अडवले व चालकासह मशीन ताब्यात घेतली. प्रशासनाच्या दक्षतेने शासकीय मालमत्ता चोरीस जाण्यापासून वाचली.
या प्रकरणी तहसील कार्यालयातील शिपाई अनंता विठोबा वाठोरे (वय ४०) यांनी सिंदखेडराजा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.तक्रारीनुसार आरोपी समाधान नारायण मोरे शुशिल प्रभाकर शिंदे, रा. ताडशिवनी या दोघांनी संगनमत करून जप्त शासकीय जेसीबी चोरून नेण्याचा प्रयत्न केल्याचे नमूद करण्यात आले आहे.
सिंदखेडराजा पोलिसांनी तत्काळ कायमी गुन्हा क्र. 232/25 नोंदवला असून, भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 303(2), 3(5) (चोरी व संगनमत) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गंभीर प्रकरणाचा तपास पीएसआय बालाजी सानप यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.
ही घटना तहसील कार्यालयाच्या सुरक्षेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण करणारी ठरली असून, महसूल विभागात मोठी चर्चा रंगू लागली आहे.

You may have missed

error: Content is protected !!