जनतेनेही दाखविला येवती सरपंचावर अविश्वास ! सरपंच प्रयागबाई पाटोळे पायउतार…..

Oplus_16777216

Oplus_16777216

लोणार (यासीन शेख) : थेट जनतेतून निवडून आलेल्या येवती येथील सरपंच प्रयागबाई पाटोळे यांच्यावर ग्रामपंचायत सदस्यांनी अविश्वास ठराव पारित केला. सरपंच जनतेतून निवडला गेल्याने आता जनताच अविश्वास प्रस्तावर निर्णय घेईल, असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्यानंतर मंगळवारी गावात विशेष ग्रामसभा घेऊन शिरगणतीने मतदान प्रक्रिया पार पडली. सदस्यांसोबतच जनतेनेदेखील प्रयागबाई पाटोळे यांच्याविरुद्ध अविश्वास दाखवत त्यांच्याविरुद्ध मतदान केले. ४१ विरुद्ध २८० असे मतदान झाल्याने सरपंचांना पायउतार व्हावे लागले.

येवती येथील नऊ ग्रामपंचायत सदस्यापैकी आठ सदस्यांनी सरपंच प्रयागबाई पाटोळे यांच्यावर अविश्वास प्रस्ताव दाखल केला होता. तो बहुमताने पारित झाला. परंतु शासन निर्णयानुसार जनतेतून निवडून आलेल्या सरपंचावर फक्त सदस्यांनी अविश्वास ठराव पारित केल्यास त्यांचे पद रिक्त होत नाही. त्यासाठी ग्रामस्थांचे मत महत्त्वाचे आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी १ जुलै रोजी ग्रामसभा घेण्याचे आदेश तहसीलदार भूषण पाटील यांना दिले. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून तहसीलदार भूषण पाटील यांनी सकाळी साडेनऊ वाजेपासून मतदान प्रक्रिया सुरू केली. ज्या मतदाराचे ग्रामपंचायत मतदार यादीत नाव आहे, अशांनाच मतदान प्रक्रियेत सहभागी करून घेण्यात आले. आधार कार्डची पडताळणी करून मतदारांना ग्रामपंचायत कार्यालयाच्या आवारात प्रवेश देण्यात आला. सकाळी साडेनऊ ते साडेअकरापर्यंत उपस्थित मतदारांना टोकन वाटप करण्यात आले. टोकन वाटप केल्यानंतर जे मतदार सरपंच प्रयागबाई यांच्या बाजूला आहेत, त्यांना एका बाजूला उभे करण्यात आले व जे विरोधात आहेत त्यांना दुसऱ्या बाजूने उभे करण्यात आले. त्यानंतर टोकन जमा करण्यात आले. एकूण ३२० मतदारांनी या प्रक्रियेमध्ये भाग घेतला. ३२० मतदारांपैकी ४० मतदारांनी सरपंचावर विश्वास दाखविला, २८० मतदारांनी सरपंचाविरुद्ध कौल देत अविश्वास प्रस्ताव संमत केला. भूषण पाटील यांनी सरपंचावर अविश्वास पारित झाल्याची जाहीर केले. सरपंचाचा पदभार उपसरपंच रामेश्वर कायंदे यांच्याकडे सोपविण्यात आला. निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पडली. यावोळी चोख पोलीस बंदोबस्त तैनात होता.

You may have missed

error: Content is protected !!