सिंदखेडराजा तालुक्यात अतिवृष्टी मदत वाटपासाठी विशेष शिबिरांचे आयोजन…..

IMG-20251213-WA0038

सिंदखेडराजा(आनिल दराडे) सिंदखेडराजा तालुक्यात अतिवृष्टी तसेच महापुरामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना शासनाकडून अनुदान व आर्थिक मदत वाटपाची प्रक्रिया सुरू आहे. मात्र या प्रक्रियेत तांत्रिक अडचणींमुळे अनेक शेतकऱ्यांचे अनुदान रखडले होते. या पार्श्वभूमीवर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या समस्या तात्काळ सोडवण्यासाठी तहसील प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
दि. ११ डिसेंबर २०२५ रोजी मा. तहसीलदार सिंदखेडराजा यांच्यासह संबंधित शासकीय कर्मचाऱ्यांची आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीत तालुक्यातील प्रत्येक मंडळात विशेष शिबिरे (कॅम्प) घेऊन अतिवृष्टी मदत वाटपाबाबतच्या तक्रारी व समस्या जागेवरच निकाली काढण्याचा निर्णय घेण्यात आला.

त्याअनुषंगाने दि. १७ डिसेंबर २०२५ रोजी सोनोशी मंडळात पहिल्या विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
या शिबिरात –

रुम्हणा परिसरातील गावांसाठी सकाळी ११.०० वाजता विठ्ठल–रुक्मिणी मंदिर, रुम्हणा येथे

वर्दडी बु. परिसरातील गावांसाठी दुपारी ०२.०० वाजता सोनपूरी बाबा देवस्थान, वर्दडी बु. येथे

अतिवृष्टी मदत वाटपाबाबतच्या समस्या, तक्रारी व प्रलंबित प्रकरणांचे निराकरण केले जाणार आहे.

या शिबिरासाठी संबंधित मंडळातील अधिनस्त ग्राम महसूल अधिकारी, ग्रामपंचायत अधिकारी, सहायक कृषी अधिकारी, महसूल सेवक, ऑपरेटर तसेच शेतकरी उपस्थित राहणार असून, शेतकऱ्यांच्या अडचणी तत्काळ सोडविण्यावर भर देण्यात येणार आहे.

या उपक्रमाबद्दल शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त करण्यात येत असून प्रशासनाने घेतलेल्या तत्पर निर्णयाबद्दल आभार व्यक्त केले जात आहेत.
सर्व शेतकरी बंधूंनी या विशेष शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन तहसील प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

You may have missed

error: Content is protected !!