जळगाव जामोद येथे जिवंत आईला मृत दाखवून मुलाने केली फसवणूक; खात्यातील १० लाख हडपले! मुलावर गुन्हा दाखल
जळगाव जामोद (बुलढाणा माझा न्युज ) जळगाव जामोद येथे चक्क मुलाने जिवंत आईला मृत घोषित करून बनावट मृत्युपत्र तयार करत नगरपरिषद कार्यालयाची फसवणूक केली या खोट्या मृत्युपत्राच्या आधारे आरोपी मुलाने आईच्या बँक खात्यातील तब्बल १० लाख रुपयांची मुदत ठेव (एफडी) मोडून रक्कम काढल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.सविस्तर वृत्त अशे की जळगाव जामोद येथील पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. फिर्यादी सुनील देवीदास निकाळजे (वय ३५, विद्युत अभियंता, नगरपरिषद, जळगाव जामोद) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, आरोपी प्रेमसिंग कमलसिंग राजपूत (रा. राजपूतपुरा, जळगाव जामोद) याने स्वतःच्या आईच्या मृत्यूबाबत खोटे व बनावट स्वयंघोषणापत्र तयार करून ते नगरपरिषद कार्यालयात सादर केले. या बनावट कागदपत्रांच्या आधारे आरोपीने नगरपरिषदेकडून आईचे मृत्युपत्र प्राप्त केले. त्यानंतर बँकेत आईच्या नावाने असलेली सुमारे १० लाख रुपयांची मुदत ठेव मोडून रक्कम काढल्याचे तक्रारीत नमूद आहे. हा प्रकार उघडकीस येताच संबंधित महिलेच्या पायाखालची वाळू सरकली आहे. या प्रकरणी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. या प्रकरणी कौशल्याबाई राजपूत यांनीही पोलिस ठाण्यात तक्रार करून संबंधितावर कठोर कारवाईची मागणी केली आहे.
