नारायणराव नागरे महाविद्यालयात महिला सक्षमीकरण व रस्ता सुरक्षा विषयावर एकदिवशीय कार्यशाळा
सिंदखेडराजा (अनिल दराडे)सिंदखेडराजा तालुक्यातील दुसरबीड येथील नारायणराव नागरे महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने महिला सक्षमीकरण व रस्ता सुरक्षा या अत्यंत महत्त्वाच्या विषयावर एकदिवशीय मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. सद्यस्थितीत महिला सुरक्षितता व वाढती रस्ते अपघातांची संख्या लक्षात घेता या कार्यशाळेला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
या कार्यशाळेत प्रमुख मार्गदर्शक म्हणून पोलीस निरीक्षक श्री. मातोंडकर यांनी उपस्थित विद्यार्थिनी व विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन केले. महिलांनी स्वतःच्या हक्कांविषयी सजग राहावे, आत्मविश्वासाने समाजात वावरावे, कायद्याची माहिती ठेवावी तसेच कोणत्याही अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्याचे धाडस बाळगावे, असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले. महिलांच्या सुरक्षेसाठी अस्तित्वात असलेल्या विविध कायदे, हेल्पलाईन क्रमांक, सायबर गुन्हे व त्यापासून बचाव याविषयीही त्यांनी मार्गदर्शन केले.
रस्ता सुरक्षा या विषयावर बोलताना पोलीस निरीक्षक मातोंडकर यांनी वाहतूक नियमांचे पालन करणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य असून, हेल्मेट, सीटबेल्टचा वापर, वेगमर्यादा पाळणे, मोबाईलचा वापर टाळणे यामुळे अनेक अपघात टाळता येऊ शकतात, यावर भर दिला. तरुण पिढीने वाहतूक नियमांचे उल्लंघन न करता स्वतःबरोबरच इतरांचेही प्राण वाचवावेत, असे आवाहन त्यांनी केले.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. दीपक देशमाने यांनी भूषविले. अध्यक्षीय भाषणात त्यांनी महिलांचे सक्षमीकरण हे केवळ घोषवाक्य न राहता प्रत्यक्ष कृतीत उतरले पाहिजे, असे मत व्यक्त केले. तसेच अशा प्रकारच्या उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जाणीव व जबाबदारी निर्माण होते, असेही त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमाचे प्रस्ताविक प्रा. कुमारी नयना गवारे यांनी केले. त्यांनी कार्यशाळेच्या आयोजनामागील उद्देश स्पष्ट करताना महिला सक्षमीकरण व रस्ता सुरक्षा हे काळाची गरज असल्याचे सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थिनी आश्विनी नागरे यांनी प्रभावीपणे केले, तर आभार प्रदर्शन विद्यार्थिनी कुमारी वैष्णवी सानप यांनी केले. या कार्यशाळेस महाविद्यालयातील प्राध्यापकवर्ग, राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे स्वयंसेवक व मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.
ही कार्यशाळा विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शक व प्रेरणादायी ठरली असून, समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी अशा उपक्रमांची नितांत गरज असल्याचे उपस्थितांनी मत व्यक्त केले.
