समान नगरसेवक निवडीमुळे चिखलीत भाजपचा विजय ठरतोय काठावरचा…सत्तेबाहेर असूनही राजकीय वजन अबाधित ठेवण्यात राहुलभाऊ बोंद्रे यशस्वी !
निलेश कोल्हे
चिखली : केंद्रात व राज्यात सत्ता असतानाही विधानसभा निवडणुकीत चिखलीत भाजप पक्ष दमदार कामगिरी करु शकला नाही. २०१९ मध्ये श्वेताताई महाले पहिल्यांदा आमदार पदी निवडून आल्यानंतर २०२४ ची विधानसभा निवडणूक त्यांना सोपी जायाला हवी होती. मात्र या निवडणुकीत काँग्रेसच्या राहुलभाऊ बोंद्रे यांचा फक्त १५०० मतांनी पराभव झाला. आताही नगरपालिका निवडणुकीत केंद्रात व राज्यात सत्ता, तसेच खुद्द मुख्यमंत्री फडणवीसांची सभा झाल्यानंतर चिखलीकरांनी नगरअध्यक्ष पदासाठी जरी भाजपला कौल दिला असला तरी नगरसेवक निवडीच्या बाबतीत समान प्रमाण ठेवले आहे. यावरुन सत्तेबाहेर असूनही राजकीय वजन अबाधित ठेवण्यात राहुलभाऊ बोंद्रे यशस्वी झाल्याचे पाहायला मिळते, हे विशेष..!
चिखलीत काँग्रेसने निवडणूक प्रचारासाठी कुठलीही मोठी सभा घेतली नाही. प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धनदादा सपकाळ अर्ज भरण्यासाठी आले तेही बोंद्रे कुटुंबियांच्या स्नेहापोटी. त्यानंतर काँग्रेसने कुठलीच मोठी सभा घेतली नाही. संपूर्ण भिस्त संभाळली एकट्या जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राहुलभाऊ बोंद्रे व त्यांच्या स्थानिक सहकाऱ्यांनी. मात्र भाजपकडून नगरपालिका निवडणुकीसाठी खुद्द मुख्यमंत्र्यांना बोलवण्यात आले. मुख्यमंत्री फडणवीस यांनी विकासाच्या डब्बल इंजिनचे आवाहन करुन चिखलीतील जागा जिल्ह्यात सर्वात जास्त मताधिक्यांनी निवडून द्या, अशी हाक दिली. मात्र या हाकेला चिखलीकरांनी प्रतिसाद दिल्याचे पाहायला मिळाले नाही. चिखली करांनी नगरअध्यक्ष पदाच्या उमेदवाराला जिल्ह्यातून सर्वात जास्त लिड दिलीच नाही. तर भाजपचे १३, काँग्रेस महाविकास आघाडीचे १३ असे समसमान नगरसेवक निवडून देऊन फडणवीसांच्या हाकेला खो दिला. प्रभागनिहाय विश्लेषण लक्षात घेतले तर राहुलभाऊ बोंद्रे यांच्या प्रभागातून नगरअध्यक्ष पदाचे काँग्रेसचे उमेदवार काशिनाथ आप्पा बोंद्रे यांना ५०० मताचा लीड देत काँग्रेसचे दोन्ही नगरसेवक निवडून आले. तर काशिनाथ आप्पा यांना त्यांच्या प्रभागात ७०० मतांचा लीड आहे व तिथेही काँग्रेसचे दोन्ही नगरसेवक निवडून आले. आमदार श्वेता महाले व पंडीतराव देशमुख यांच्या स्वतः च्या प्रभागातही काँग्रेसचे नगरसेवक निवडून आल्याने काँग्रेसचा जनाधार यावरुन अधोरेखित होतो.
अल्पसंख्याक मतदारांचा कौल ही काँग्रेसलाच..
भाजपकडून मुस्लिम समाजाच्या पाच उमेदवारांना उमेदवारी देण्यात आली होती. तर काँग्रेसने ६ जणांना निवडणूक रिंगणात उतरवले होते. यात काँग्रेसचे ४ उमेदवार विजयी झाले आहे तर प्रभाग ३ ब ची जागा अवघ्या ३२ मतांनी पडली आहे. तर भाजपच्या फक्त एका मुस्लिम उमेदवाराला विजय संपादन करता आला. भाजपच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराला फायदा व्हावा म्हणून मुस्लिम उमेदवारांना उभे करण्यात आले होते अशी चर्चा गावभर पसरली आहे. एकंदरीत सर्वधर्म समभाव, सर्वांना सोबत घेऊन चालण्याच्या धोरणामुळे जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राहुलभाऊ बोंद्रे सत्तेबाहेर राहूनही जनाधार कायम ठेवण्यात अग्रेसर ठरले आहे.
