रब्बी हंगाम ई-पीक पाहणीसाठी शेतकऱ्यांना तहसीलदार अजित दिवटे आवाहन,अंतिम मुदत २४ जानेवारी २०२६
सिंदखेडराजा (अनिल दराडे ) महाराष्ट्र शासनाच्या महत्वाकांक्षी रब्बी हंगाम २०२५ ई-पीक पाहणी (Digital Crop Survey – DCS) उपक्रमाची अंमलबजावणी १० डिसेंबर २०२५ पासून सुरू झाली असून, शेतकऱ्यांनी स्वतःच्या ७/१२ उताऱ्यावर पीक पेरा अँड्रॉईड मोबाईलद्वारे नोंदवणे बंधनकारक आहे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
शेतकरी स्तरावर ई-पीक पाहणी करण्याची अंतिम मुदत २४ जानेवारी २०२६ असून, त्याआधी नोंदणी पूर्ण करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी मा. डॉ. किरण पाटील (भा.प्र.से.) यांनी दिले आहेत.जिल्ह्यात केवळ १५.२९ टक्के नोंदणी पूर्ण
बुलढाणा जिल्ह्यात रब्बी हंगाम २०२५ अंतर्गत आतापर्यंत ३४,७४३.७१ हेक्टर क्षेत्रावर तसेच एकूण ७,९९,१९५ ओनर्स प्लॉटपैकी ३१,००२ प्लॉटवर शेतकऱ्यांनी DCS व्हर्जन 4.0.5 मोबाईल अॅपद्वारे ई-पीक पाहणी नोंदवली आहे. सध्या जिल्ह्यात फक्त १५.२९ टक्के क्षेत्रावरच नोंदणी झाल्याने प्रशासनाने उर्वरित शेतकऱ्यांना तातडीने नोंदणी करण्याचे आवाहन केले आहे.मोबाईल नसल्यास तलाठी-CSC ची मदत घ्यावी.
नोंदणी न केल्यास ७/१२ कोरा राहणार.ई-पीक पाहणी न केल्यास ७/१२ उताऱ्यावर पीक पेरा कोरा राहील, जो नंतर दुरुस्त करता येणार नाही. त्यामुळे पीक विमा, शासकीय अनुदान व इतर लाभ मिळण्यात अडथळे येऊ शकतात. नैसर्गिक आपत्ती किंवा अवेळी पावसामुळे नुकसान झाल्यास विमा मिळण्यासाठी ७/१२ वर अचूक पीक नोंद आवश्यक आहे.
त्यामुळे सर्व शेतकरी बांधवांनी २४ जानेवारी २०२६ पूर्वी ई-पीक पाहणी पूर्ण करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी कार्यालय, बुलढाणा यांच्या वतीने करण्यात आले आहे. तसेच तहसीलदार अजित दिवटे यांनी तालुक्यातील शेतकरी बांधवांना रब्बी हंगामी पीक पाहणीसाठी आवाहन केले आहे.
