वझर सरकटे–वझर आघाव मधोमध खडकपूर्णा नदीवरील कोल्हापुरी बंधाऱ्याची दुरवस्था

Screenshot_2025-12-26-17-35-56-20_3a637037d35f95c5dbcdcc75e697ce91

रघुनाथ आघाव लोणार तालुका प्रतिनिधी

लोणार :- २२ गावांना भीषण पाणीटंचाईचा धोका, रब्बी हंगाम धोक्यात वझर सरकटे व वझर आघाव या दोन गावांच्या मधोमध असलेल्या खडकपूर्णा नदीवरील कोल्हापुरी बंधाऱ्याची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. बंधाऱ्याचे काही दरवाजे पूर्णपणे जिर्ण झाले असून काही दरवाजे मागील पावसाळ्यातील पुरात वाहून गेले आहेत. मात्र, याकडे संबंधित पाटबंधारे विभागाने दुर्लक्ष केल्याचा आरोप स्थानिक नागरिक व शेतकरी करत आहेत.

या वर्षी बंधाऱ्याच्या प्रत्येक मोरीवर केवळ तीन दरवाजे बसवण्यात आले आहेत. प्रत्यक्षात अधिक दरवाज्यांची आवश्यकता असताना अपुरी दुरुस्ती करण्यात आल्यामुळे पाणी साठवणुकीवर मोठा परिणाम झाला आहे. परिणामी, भविष्यात या बंधाऱ्यावर अवलंबून असलेल्या वझर सरकटे वझर आघाव भुमराळा सावरगाव तेली चांगेफळ खापरखेड यासह २० ते २२ गावांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागू शकतो, अशी भीती व्यक्त केली जात आहे.
या बंधाऱ्याच्या पाण्यावर परिसरातील शेती, पिण्याचे पाणी तसेच जनावरांचे पाणी अवलंबून आहे. मात्र, बंधाऱ्यातून पाणी साठवण्याऐवजी मोठ्या प्रमाणावर पाणी वाया जात असल्याने शेतकरी वर्ग चिंतेत सापडला आहे. विशेष म्हणजे, यावर्षी आधीच अतिवृष्टीमुळे खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यात आता पाण्याचा साठा अपुरा असल्यामुळे रब्बी हंगामही धोक्यात आला आहे.

वेळीच बंधाऱ्याची दुरुस्ती व आवश्यक त्या संख्येने दरवाजे बसवले नाहीत, तर शेतीसह ग्रामीण भागातील पाणीपुरवठ्याचा प्रश्न गंभीर होण्याची शक्यता आहे. स्थानिक शेतकरी व ग्रामस्थांनी प्रशासनाकडे वारंवार मागणी करूनही अद्याप ठोस उपाययोजना करण्यात आलेली नाही, असा आरोप होत आहे.
प्रशासनाने तातडीने या कोल्हापुरी बंधाऱ्याची पाहणी करून संपूर्ण दुरुस्ती करावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही नागरिकांनी दिला आहे.

You may have missed

error: Content is protected !!