नागरे महाविद्यालयाच्या रासेयो निवासी श्रमसंस्कार शिबिरात जलसंवर्धनाचा उपक्रमवर्दडी येथे बंधाऱ्याची निर्मिती धनश्री कायदे

Screenshot_2026-01-04-09-00-49-39_6012fa4d4ddec268fc5c7112cbb265e7

सिंदखेडराजा (अनिल दराडे)
नारायणराव नागरे महाविद्यालय, दुसरबीड यांच्या राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत सुरू असलेल्या निवासी श्रमसंस्कार शिबिरात पाणी आडवा – पाणी जिरवा या संकल्पनेवर आधारित जलसंवर्धनाचा महत्त्वपूर्ण उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमांतर्गत वर्दडी गावाच्या हद्दीत जल व्यवस्थापनासाठी बंधाऱ्याची निर्मिती करण्यात आली.
या बंधाऱ्याच्या माध्यमातून पावसाचे पाणी अडवून त्याचा जमिनीत मुरवठा होणार असून याचा थेट लाभ परिसरातील शेतकऱ्यांना होणार आहे. विशेषतः या भागातील विहिरींच्या जलपातळीत वाढ होईल, असा विश्वास महाविद्यालयाचे प्राचार्य तथा राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी डॉ. विजय नागरे यांनी व्यक्त केला. ग्रामीण भागातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी अशा शाश्वत आणि दीर्घकालीन उपाययोजना आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.
डॉ. विजय नागरे यांनी राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारीपद स्वीकारल्यानंतर महाविद्यालयाच्या वतीने परिसरातील विविध गावांमध्ये जलसंवर्धनाचे उपक्रम सातत्याने राबविण्यात आले आहेत. यामध्ये तढेगाव, दुसरबीड, जऊळका, पिंपळगाव कुडा या गावांमध्ये बंधाऱ्यांची निर्मिती करण्यात आली असून आजही हे बंधारे नागरे महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या सामाजिक कार्याची साक्ष देत आहेत.
या उपक्रमात रासेयो स्वयंसेवक विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष श्रमदानातून सक्रिय सहभाग नोंदवला. निवासी शिबिराच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना पर्यावरण संवर्धन, जल व्यवस्थापन व ग्रामीण समस्यांचे भान येत असून समाजासाठी योगदान देण्याची जाणीव अधिक दृढ होत असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.
यावेळी प्रा. देवानंद सानप, प्रा. गजानन राठोड यांच्यासह राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक व वर्दडी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या बंधाऱ्यामुळे वर्दडी गावातील शेती, पाणीपुरवठा व पर्यावरणीय समतोल राखण्यास दीर्घकालीन फायदा होईल, अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली.

You may have missed

error: Content is protected !!