युवा पत्रकार जैनुल आबेद्दीन यांना ‘महेश रत्न पुरस्काराने’ भव्य सन्मान
डोणगाव (बुलढाणा माझा न्युज ) समाजातील वास्तव, अन्याय, भ्रष्टाचार व सामान्य जनतेच्या ज्वलंत प्रश्नांना निर्भयपणे वाचा फोडणारे युवा पत्रकार जैनुल आबेद्दीन यांना महेश अर्बन सोसायटीच्या वतीने प्रतिष्ठित ‘महेश रत्न पुरस्कार’ प्रदान करून भव्य सन्मान करण्यात आला. पत्रकारितेच्या क्षेत्रात त्यांनी अल्पावधीतच केलेल्या निष्ठावंत, प्रामाणिक व समाजाभिमुख कार्याची दखल घेत हा मानाचा पुरस्कार देण्यात आला आहे.
युवा पत्रकार जैनुल आबेद्दीन यांनी आपल्या लेखणीच्या माध्यमातून ग्रामीण तसेच शहरी भागातील सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न सातत्याने शासन व प्रशासनाच्या दरबारी मांडले आहेत. भ्रष्टाचार, अवैध व्यवसाय, सामाजिक अन्याय, दुर्लक्षित घटकांचे प्रश्न, शेतकरी समस्या, शिक्षण, आरोग्य, पाणीपुरवठा, रस्ते, वीज यांसारख्या मूलभूत सुविधांशी संबंधित विषय त्यांनी निर्भीडपणे मांडून अनेक वेळा प्रशासनाला कारवाईस प्रवृत्त केले आहे.
त्यांच्या पत्रकारितेतील सत्यता, परखड मांडणी, निर्भय भूमिका आणि जनहिताची कळकळ यामुळे अल्पावधीतच त्यांची स्वतंत्र व विश्वासार्ह ओळख निर्माण झाली आहे.
महेश अर्बन सोसायटीच्या वतीने आयोजित सन्मान सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साहात पार पडला. यावेळी बोलताना आयोजकांनी सांगितले की,
“समाजात सकारात्मक परिवर्तन घडवून आणण्यासाठी पत्रकारांची भूमिका अत्यंत मोलाची आहे. सत्याच्या बाजूने ठाम उभे राहणाऱ्या आणि जनतेच्या प्रश्नांना प्राधान्य देणाऱ्या युवा पत्रकारांचा सन्मान व्हावा, या उद्देशाने ‘महेश रत्न पुरस्कार’ दिला जातो. युवा पत्रकार जैनुल आबेद्दीन यांनी आपल्या कार्यातून या पुरस्काराची प्रतिष्ठा अधिक उंचावली आहे.”
पुरस्कार स्वीकारताना युवा पत्रकार जैनुल आबेद्दीन यांनी भावना व्यक्त करताना सांगितले की,
“हा सन्मान माझ्यासाठी केवळ एक पुरस्कार नसून माझ्या जबाबदाऱ्यांची जाणीव करून देणारा आहे. समाजातील अन्याय, शोषण आणि जनतेच्या समस्या मांडण्यासाठी माझी लेखणी सदैव सज्ज राहील. सत्य, निर्भयता आणि जनहित या मूल्यांशी कधीही तडजोड न करता पुढील काळातही पत्रकारितेचे कार्य करीत राहीन.”
या पुरस्कारामुळे युवा पत्रकार जैनुल आबेद्दीन यांच्या पत्रकारितेच्या कार्याला नवी ऊर्जा मिळाली असून विविध स्तरांतून त्यांचे अभिनंदन होत आहे. सामाजिक, शैक्षणिक, राजकीय तसेच पत्रकार बांधवांनी त्यांच्या कार्याचे कौतुक करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत. ‘महेश रत्न पुरस्कार’ मिळाल्याने त्यांच्या यशात मानाचा शिरपेच रोवला गेला असून हा सन्मान युवा पत्रकारांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.
यावेळी महेश अर्बन बँकेचे संचालक सुरेश फिस्के, आनंद सावजी,प्रशांत चोपडे बँकेचे शाखा अधिकारी डोंगरदिवे, पत्रकार प्रा. दिनोरे सर, जमील पठाण, सचिन गाभणे, जमीर शाह, सुरेंद्रसिंह चव्हाण, राजेश वाघमारे, सुबोध आखाडे, गणेश लहाने, आवेज पठाण, हमीद मुल्लाजी, गणेश पळसकर,अबरार खान, गजानन वाघमारे आदी मान्यवर उपस्थित होते.
